बनावट प्रमाणपत्रधारक डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 07:40 PM2019-04-18T19:40:40+5:302019-04-18T20:00:31+5:30
मूळचा सांगलीतील रहिवासी असलेल्या पाटील याच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंबई - महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे (महाराष्ट्र मेडिकल काउंसिल - एमएमसी) बनावट प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपाखाली धीरज पाटील (29) या डॉक्टरला आग्रीपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मूळचा सांगलीतील रहिवासी असलेल्या पाटील याच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सांगलीतील रहिवासी असलेल्या धीरज पाटील याने 2012 मध्ये वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण रशियातून पूर्ण केले. असे शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी भारतीय वैद्यकीय परिषदेची (एमसीआय) विशेष परीक्षा (एनबीई) उत्तीर्ण होणे बंधनकारक असते. पाटील याने एमएमसीला 2012 ते 2016 या काळात एमसीआय प्रमाणपत्र, एनबीई गुणपत्रिका व इतर कागदपत्रे सादर केली. त्याने सादर केलेल्या एनबीई परीक्षेची गुणपत्रिका आणखी एका विद्यार्थ्यानेही दिल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. दरम्यान पाटीलने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर एमएमसीने आग्रीपाडा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पाटील याने सांगलीतील स्थानिक न्यायालय व उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. न्यायालयांनी ते फेटाळले आणि त्यानंतर त्याला आग्रीपाडा पोलिसांपुढे हजर होण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तो मंगळवारी आग्रीपाडा पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पाटील दिल्लीत दिलेल्या एनबीई परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. त्याने एमसीआयला सादर केलेले प्रमाणपत्र कुठून मिळविले याबाबत पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, त्याच्या कुटुंबातील एक सदस्य आमदार असल्याचे सूत्रांनी सांगितले.