साडेनऊ लाख रुपयांची बनावट नाणी जप्त, दिल्ली पोलिसांची मुंबईत कारवाई; एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:40 PM2023-02-04T12:40:38+5:302023-02-04T12:41:35+5:30
Crime News: बनावट नाणी तयार करून धार्मिक स्थळांवर त्यांचा वापर करणाऱ्या टोळीचा काळा धंदा दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबईत कारवाई करत मालाड येथून जिग्नेश गाला (४२) यास अटक केली.
मुंबई : बनावट नाणी तयार करून धार्मिक स्थळांवर त्यांचा वापर करणाऱ्या टोळीचा काळा धंदा दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबईत कारवाई करत मालाड येथून जिग्नेश गाला (४२) यास अटक केली. त्याच्याकडून एक, पाच आणि १० रुपयांची ९ लाख ४६ हजार रुपये किमतीची बनावट नाणीही जप्त केली.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, हरियाणामध्ये बनावट नाणी तयार करण्याचा कारखाना चालवला जात होता. त्यावर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून मुंबईत मोठ्या प्रमाणात बनावट नाणी पुरवली जात असून, त्यांचा वापर धार्मिक स्थळांवर केला जात असल्याचे समजले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बुधवारी रात्री मुंबईत येऊन आमची मदत मागितली. त्यानुसार मालाड येथील वल्लभ बिल्डिंग ए-विंग सोसायटीमध्ये संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात नाणी जप्त केली, असे दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात यांनी सांगितले. मंदिरात सुटे पैसे देऊन त्या बदल्यात नोटा घेतल्या जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे असून दिल्ली पोलिस चौकशी करत आहेत.
स्थानिक दुकानदार मंदिरात येणाऱ्या सुट्या पैशांच्या बदल्यात आम्हाला नोटा देतात. मात्र, चिल्लर देऊन नोटांची विचारणा अद्याप आमच्याकडे करण्यात आली नव्हती. बनावट नाण्यांचा प्रकारही पहिल्यांदा ऐकिवात आला. आम्ही भविष्यात याबाबत काळजी घेऊ.
-हेमंत जाधव, प्रबंधक, मुंबादेवी मंदिर.