नवी मुंबईत कोरोनाची बनावट लस प्रमाणपत्रे; पालिकेच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 10:51 AM2021-12-18T10:51:35+5:302021-12-18T10:51:57+5:30
एपीएमसी आवारात कोविड १९ च्या लसीचे बनावट सर्टिफिकेट विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे.
नवी मुंबई : एपीएमसी आवारात कोविड १९ च्या लसीचे बनावट सर्टिफिकेट विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे. त्यांच्याकडून सात बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तीन हजार रुपयांना एका प्रमाणपत्राची विक्री केली जात होती. याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये ऑनलाइन सेवा केंद्रचालकासह पालिकेच्या दोन कंत्राटी कामगारांचा समावेश आहे.
एपीएमसी मसाला मार्केटमध्ये कोविड १९ चे दोन्ही डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र विकले जात असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे उपनिरीक्षक शरद आव्हाड यांनी पथक तयार केले होते. या पथकाने मंगळवारी रात्री मसाला मार्केट आवारात बनावट ग्राहकाद्वारे सापळा रचला होता. त्यामध्ये या टोळीचा भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी नितीन आनंदराव शिंदे, विराज वाक्षे व अमोल झेंडे यांना अटक करण्यात आली आहे.
नितीन याचे एपीएमसीमध्ये ऑनलाइन सेवा केंद्र आहे, तर विराज व अमोल हे महापालिकेच्या एनएमएमटीमध्ये कंत्राटी वाहक आहेत. त्यापैकी अमोल हा सध्या तुर्भेतील लसीकरण केंद्रावर डेटा इंट्रीचे काम करत होता. नितीनच्या ऑनलाइन सेवा केंद्रातून मोठ्या प्रमाणात दोन्ही डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्रे व स्मार्ट कार्ड आढळून आली आहेत. ही प्रमाणपत्रे कल्याण, डोंबिवली भागातील रहिवाशांची असल्याचे समजते.
एपीएमसी आवारातील व्यक्तींना अशी प्रमाणपत्रे दिली जात होती. त्यासाठी नितीन याने त्याच मित्र विराजच्या मदतीने तुर्भे लसीकरण केंद्रात काम करणाऱ्या अमोलला संपर्क साधला होता. यावेळी पैशाच्या आमिषाला भुलून अमोलने पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आयडी वापरून, शासनाच्या संकेतस्थळावर बनावट नोंदी केल्या होत्या. मात्र पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात बनावट ग्राहकालादेखील त्यांनी अशाप्रकारे प्रमाणपत्र दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
एक प्रमाणपत्र तीन हजारांना
रेल्वे, बस यामधून प्रवासासाठी मॉल, नाट्यगृह यात प्रवेश मिळविण्यासाठी तसेच कामाच्या ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासले जाते. त्याद्वारे अशाच ठिकाणी वापरासाठी त्यांनी अनेकांना बनावट लस प्रमाणपत्र विकल्याची शक्यता आहे. एका प्रमाणपत्राची तीन हजार रुपयांना विक्री केली जात होती. याप्रकरणी एपीएमसी पोलीस अधिक तपास करत आहेत.