सावधान! कोरोनाची बनावट लस बाजारात येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 05:47 AM2021-01-09T05:47:57+5:302021-01-09T05:48:10+5:30
Corona Vaccine: रोखण्याची योजना : १६ देशांचे गुप्तचर, तपास अधिकाऱ्यांचे व्यासपीठ
- एस. के. गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात जून महिन्यापासून कोरोना लस सामान्य जणांना टोचणे सुरू होईल व त्याच वेळी बनावट कोरोना लसही बाजारात येऊ शकते. ही शंका लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात १६ देशांचे गुप्तचर आणि तपास अधिकारी एकजुटीने काम करतील.
असोसिएशन ऑफ प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेटर्सने (एपीडीआय) ग्लोबल अलायन्स अगेंस्ट फेक व्हॅक्सीनची (जीएएफव्ही) स्थापना केली आहे. त्यात जगातील खासगी गुप्तचर आणि तपास करणारे सहभागी होतील. या जागतिक सहयोग व्यासपीठाचा उद्देश बाजारात येणारी बनावट लस ओळखून तिचा प्रसार रोखण्याचा आहे.
एपीडीआयचे अध्यक्ष कुंवर विक्रम सिंह म्हणाले की, अस्सल लसीसोबत मोठ्या प्रमाणावर बनावट लसही येऊ शकते. युरोपियन युनियनची संस्था युरोपोलने बनावट लसीबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे. इंटरपोलनेही गेल्या महिन्यात पर्पल नोटीस जारी केली. ही नोटीस दक्षिण अफ्रिकेत जोहानसबर्गस्थित एका गोदामात बनावट लस मिळाल्यानंतर जारी केली. यानंतर जागतिक व्यासपीठ स्थापन केले गेले.
एपीडीआयने नेतृत्व सांभाळताना वेगवेगळ्या देशांना या व्यासपीठात सहयोगी बनण्याचे आवाहन केले.
आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे कार्यरत...
विक्रम सिंह म्हणाले की, ‘एपीडीआयकडून पंतप्रधानांना याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बनावट लसी पकडण्यासाठी सरकारला मदत करण्यास आम्ही तयार आहोत. काही बनावट ओषध कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावर बनावट लसी बनविण्याच्या प्रयत्नांत आहेत.
या कंपन्या बाजारात उपलब्ध अस्सल लसीशी मिळतीजुळती लस बनविण्याची तयारी करीत आहेत. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. ते नष्ट करण्याची गरज आहे. आशा आहे की, जगात सरकार त्या प्रयत्नांना निपटून काढण्याची तयारी करीत आहे. परंतु, आम्ही आमच्याकडून बनावट लसींना रोखण्यासाठी सर्व शक्य ती मदत करायला तयार आहोत,” असेही सिंह म्हणाले.