ग्राहकांना दिली बनावट क्रिप्टो करन्सी; मॉरिस क्रिप्टो कंपनीची १४ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 06:25 AM2022-07-12T06:25:00+5:302022-07-12T06:25:54+5:30
दैनंदिन व्याजाचेही आमिष
मुंबई : ग्राहकांना बनावट क्रिप्टो करन्सी वितरित करत त्यावर दिवसाकाठी किमान २ ते ३ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविल्याप्रकरणी मॉरिस क्रिप्टो करन्सी कंपनीची १४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) सोमवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये कंपनीच्या बँक खात्यातील रोख रक्कम, कोची येथील एक रुग्णालय आणि तामिळनाडू येथील ५२ एकर शेतजमीन यांचा समावेश आहे.
ईडीच्या प्रसिद्ध पत्रकानुसार, मॉरिस कंपनीने क्रिप्टो कंपनीसोबतच आपल्या अन्य दोन कंपन्यांच्या माध्यमातून देशभरातील सामान्य ग्राहकांसमोर गुंतवणुकीच्या विविध योजना सादर केल्या. याचाच भाग म्हणून क्रिप्टो करन्सीची देखील योजना सादर केली. या योजनेचा प्रसार झपाट्याने व्हावा आणि अधिकाधिक गुंतवणूक व्हावी म्हणून ग्राहकांना दिवसाकाठी २ ते ३ टक्के व्याज देण्याचेही आमिष दिले. कंपनीच्या या योजनेला भुलून त्यामध्ये हजारो लोकांनी गुंतवणूक केली. मात्र, काही काळानंतर परतावा मिळणे बंद झाल्यानंतर अनेक ग्राहकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
अनेक ठिकाणी तक्रारी
कंपनीच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या. यातील आर्थिक व्याप्ती वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला आणि देशातील अनेक प्रमुख शहरांतून छापेमारी केली. यादरम्यान ईडीला मिळालेल्या कागदपत्रांवरून, मॉरिस कंपनीने बाजारात आणलेली क्रिप्टो करन्सी ही बनावट असल्याचे निदर्शनास आले.
तसेच, कंपनीने क्रिप्टो तसेच अन्य गुंतवणूक योजनांद्वारे जमा केलेले पैसे हे काही बनावट कंपन्या स्थापन करून त्यामध्ये हे पैसे वळवत त्याचा व्यक्तिगत वापर सुरू केल्याचेही निदर्शनास आले.
- कारवाईच्या पहिल्या टप्प्यात ईडीने कंपनीची ३६ कोटी ७२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा केलेल्या छापेमारीमध्ये १४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
- आतापर्यंत कंपनीची सुमारे ५० कोटी ७२ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केलेली आहे. तसेच, या प्रकरणी मॉरिस क्रिप्टो करन्सी कंपनीच्या दोन मालकांसह अन्य चार जणांना या प्रकरणात अटक केली आहे.