वाहन चालविण्याचा बनावट परवाना देणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 07:52 PM2019-11-27T19:52:18+5:302019-11-27T19:54:35+5:30

बनावट परवाना घेऊन फिरणाऱ्या लोकांची शहरात एक साखळीच असून, अशा लोकांची संख्या ४० च्या वर असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Fake driving license maker gang arrested in Aurangabad | वाहन चालविण्याचा बनावट परवाना देणारी टोळी जेरबंद

वाहन चालविण्याचा बनावट परवाना देणारी टोळी जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देदोघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : वाहन चालविण्याचा बनावट परवाना बनवून देणाऱ्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेने जेरबंद केले असून, कलर प्रिंटर, लॅमिनेशन मशीन, लॅपटॉपसह इतर साहित्य त्याच्या ताब्यातून जप्त केले आहे. आरोपीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. 

भाऊसाहेब साहेबराव लेंडे (३२, रा. हिरापूर, ता. पैठण), शेख एजाज शेख महेमूद (३०, रा. आडूळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बनावट वाहनचालविण्याचा परवाना बनवून देणारे दोन जण मध्यवर्ती बसस्थानकावर येणार आहे, असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन मोरे, पोलीस नाईक भगवान शिलोटे, विलास वाघ, परभत म्हस्के, पो. कॉ. विशाल पाटील, नितीन देशमुख यांचे पथक रवाना झाले. (दि.२५) रोजी प्रवेशद्वारावर सापळा रचला असता भाऊसाहेब साहेबराव लेंडे हे जाळ्यात अडकले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ वाहन चालविण्याचा बनावट परवाना मिळाला.

लेंडे याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आडूळ येथे शेख एजाज शेख महेमूद याच्याकडून हा परवाना घेतल्याचे सांगितले. त्याचा शोध घेण्यासाठी लेंडे यास फोन लावण्यास सांगितले असता, तो शहरातच असल्याचे समजले. त्याला मध्यवर्ती बसस्थानकात बोलवून घेत पथकाने ताब्यात घेतले. आरोपीकडे सापडलेला परवाना आरटीओ कार्यालयात पाठविला असता तो बोगस असल्याचे आढळून आले. त्या नंबरचा मूळ परवाना हा दुसऱ्याच व्यक्तीकडे असल्याचे समजले. आडूळ येथील एजाजच्या दुकानावर छापा मारून त्याच्या दुकानातील लॅपटॉप, कलर प्रिंटर, लॅमिनेशन मशीन, इतर साहित्यासह तीन बनावट तयार परवानेदेखील आढळून आले. ते साहित्य पथकाने जप्त केले. 

मोठी साखळी असल्याचा अंदाज
बनावट परवाना घेऊन फिरणाऱ्या लोकांची शहरात एक साखळीच असून, अशा लोकांची संख्या ४० च्या वर असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. २०१७ पासून एजाज याने बनावट परवाने बनविण्यास सुरुवात केली आहे.४अनेक वाहनचालक विशेष प्रशिक्षण न घेता बनावट परवाने बाळगून फिरताहेत. या चालकांनी शासनाची दिशाभूल करून महसूल बुडविला, तसेच अनेकांचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यांचा शोध गुन्हे शाखेचे पथक घेत आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कार्डातून माहिती मिळत नाही
आरटीओ कार्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या वाहन चालविण्याच्या परवान्याचा क्रमांक सारथी या संकेतस्थळावर टाकल्यानंतर परवान्यासंदर्भातील आवश्यक ती माहिती मिळते, तसेच कार्डवरील चीपद्वारेही ही माहिती प्राप्त होऊ शकते. मात्र, बनावट परवान्यात हे शक्य होत नाही. परवाना बनावट आहे, हे सर्वसामान्यांच्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनधारकांनी सावध राहिले पाहिजे.
- रमेशचंद्र खराडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Fake driving license maker gang arrested in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.