मुंबई जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या नावे फेक फेसबुक अकाउंट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 08:10 PM2019-04-12T20:10:56+5:302019-04-12T20:11:58+5:30
चक्क मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाचेच बनावट फेसबुक अकाउंट कोणीतरी उघडल्याचं उघडकीस आलं आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीदरम्यान चुकीची माहिती वा बातम्यांना पसरू नये म्हणून शासकीय यंत्रणा योग्य ती खबरदारी घेत आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी हे माध्यम कक्षाद्वारे फेक बातम्या, फेक पोस्ट, फेक फेसबुक, ट्विटर अकाऊंट यावर वॉच ठेवून आहेत. मात्र, चक्क मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाचेच बनावट फेसबुक अकाउंट कोणीतरी उघडल्याचं उघडकीस आलं आहे.
'कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफ मुंबई सिटी' या नावाने कुणी अनोळखी व्यक्तीकडून हे फेसबुक अकाउंट बनविण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यम कक्षाच्या निदर्शनास ही बाब आली आहे. त्यानंतर तात्काळ त्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम सेलला याबाबत सूचना दिल्या आहेत. विशेषत: मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या बनावट फेसबुक अकाऊंटवर विविध पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे हे अकाउंट तात्काळ बंद करण्याच्या सूचना मुंबई जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत.