घरातच सुरू होता बनावट दागिन्यांचा कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 04:58 AM2019-07-23T04:58:01+5:302019-07-23T04:58:15+5:30
चांदीवर सोन्याचा मुलामा देत हॉलमार्कचा वापर : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांना दोन कोटींचा गंडा
मुंबई : चांदीवर सोन्याचा मुलामा देत त्यावर हॉलमार्कचा वापर करत घरातच बनावट सोन्याचे दागिने बनवायचे. ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांसह पतसंस्थांमध्ये गहाण ठेवून कर्ज घ्यायचे. अशाच प्रकारे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील २० हून अधिक बँकांकडून दोन कोटींपेक्षा जास्तीचे कर्ज घेणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केला.
यात, मूळचे राजस्थानचे रहिवासी रमेश रामअवतार सोनी, दिनेश रामअवतार सोनी, बिमल रामअवतार सोनी या भावंडांसह अनिलकुमार गुलाबचंद्र स्वामी, प्रशांत संदरेशन नारायण, नीतू सतीशन विलयील या सहा जणांना अटक केली. दिनेश हा मास्टरमाइंड आहे. यापूर्वी तिघेही भाऊ राजस्थानमध्ये सोने कारागीर होते. दिनेशच्या भावाच्या नावे भार्इंदरमध्ये फ्लॅट आहे. येथूनच ते हे काम करत. ते चांदी, अन्य धातूच्या वस्तूंना सोन्याचा मुलामा देत. त्यावर हॉलमार्कचा वापर करायचे. सुरुवातीला त्यांनी थोडे सोने बँकांमध्ये गहाण ठेवले. कुणालाही संशय न आल्याने, गेल्या दोन वर्षांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून २० हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँका, पतसंस्थांत दोन कोटींहून अधिकचे दागिने गहाण ठेवले. त्यावर कर्ज घेतल्यावर ते नॉट रिचेबल होत. त्यामुळे बँका दागिन्यांचा लिलाव करत असत.
अखेर बिंग फुटले
मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, पोलीस निरीक्षक सतीश मयेकर, संतोष गायकर, धीरज कोळी यांच्यासह फौजदार आणि अंमलदारांनी अधिक तपास करत या टोळीचे बिंग फोडले.
कुटुंबीयांचाही सहभाग
सोनी बंधू हे कुटुंबासी राहतात. त्याचा एक भाऊ सीए आहे. पत्नी, अन्य नातेवाइकांनाही याबाबत माहिती होती. पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान नीतू अंधेरीत राहते. ती कॉलसेंटरमध्ये नोकरीला आहे. तिने ७० लाखांच्या दागिन्यांवर कर्ज घेतल्याचे समोर आले. तर, प्रशांत पवईत राहतो.
या बँकांमध्ये ठेवले दागिने गहाण कोटक महिंद्रा बँक, आयआयएफएल, यस, महानगर, सीएसबी, डीसीबी, फेडरल, मुंबई, स्टेट बँक आॅफ इंडिया, सांगली सहकारी पतपेढी, ग्रेटर बँक, जनसेवा बँक, केएनएस, मणप्पूरम गोल्डसह विविध वित्तीय संस्थांमध्ये या मंडळींनी दागिने गहाण ठेवले आहेत.
बँकांना सतर्कतेचा इशारा
बँकांमध्ये सोने गहाण ठेवण्याच्या प्रक्रियेत बदल करणे गरजेचे आहे. अशा अनेक टोळ्या कार्यरत असल्याची शक्यता आहे. हॉलमार्क, त्याला घासून पाहून दागिने खरे असल्याचा अंदाज बांधू नये. त्यात लिलावातून दागिने घेताना व्यापाऱ्यांनी शहानिशा करावी, असे मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी सांगितले.
असे आले प्रकरण उघडकीस
लिलावातूनच वाकोला येथील रहिवासी असलेले प्रणित जाधव (२२) यांनी १ लाख ६४ हजार ९३९ रुपयांचे दागिने खरेदी केले. पुढे चौकशीत हे दागिने बनावट असून त्यावर बनावट हॉलमार्कचा वापर केल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्यानुसार, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, मालमत्ता कक्षाने तपास सुरू केला.
अशी बनली गँग
सोनी बंधू तसेच अन्य आरोपी यापूर्वी एकाच इमारतीत राहायचे. त्यातून त्यांची ओळख झाली. याच ओळखीचा फायदा पुढे फसवणुकीसाठी करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट होत आहे.