दुसऱ्या पत्नीच्या व्हिसासाठी बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालिकांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 06:51 AM2023-01-19T06:51:49+5:302023-01-19T06:52:08+5:30
कुर्ला पोलिसांकडून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलाच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. फ्रान्सचे नागरिकत्व असलेल्या महिलेच्या व्हिसासाठी बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी फराज मलिक आणि त्यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा केलेल्या लॉरा हॅमलीनसह इतर जणांविरोधात कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१९ मध्ये हॅमलीनचा टुरिस्ट व्हिसाची मुदत संपल्याने तिने व्हिसासाठी विशेष शाखा २ मध्ये अर्ज केला. यावेळी फराज मलिक सोबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच फराज मलिक यांचे हमीपत्रासह कागदपत्रे जमा केली. मात्र, कागदपत्रांबाबत विशेष शाखेला संशय आल्याने त्यांच्याकडून याबाबत तपास सुरू होता. अखेर, गेल्या आठवड्यात हे प्रकरण कुर्ला पोलिसांकडे तपासासाठी आले. कुर्ला पोलिसांनी केलेल्या चौकशीत, व्हिसासाठी दिलेल्या विवाह प्रमाणपत्राची नोंदणी केली नसतानाही बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, पोलिसांनी हॅमलीन, फराज विरोधात बनावट कागदपत्रे तयार केल्याचा ठपका ठेवत फसवणूक, बनावट कागदपत्रे, फॉरेन ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फराज मलिक याचे बुशराहसोबत पहिले लग्न झाले असून तिला दोन मुली आहे. ती फराज सोबत राहत नसून दुसरीकडे राहण्यास आहे.
कोविड, गर्भवती राहिल्याने व्हिसामध्ये केली होती वाढ
- २७ एप्रिल २०१५ मध्ये फराजने लॉरासोबत दुसरा विवाह केला. त्यानंतर, अनेकदा कोविड तसेच गर्भवती राहिल्याने टुरिस्ट व्हिसामध्ये वाढ करण्यात आली होती. मात्र, पुढे तिने भारतीय व्यक्तीसोबत विवाह केला म्हणून “एक्स वन” व्हिसासाठी अर्ज केला.
- याअंतर्गत परदेशी व्यक्तीला भारतीय व्यक्तीशी लग्न केल्याबाबत नमूद होते. आणि ती भारतात राहू शकते. मात्र, त्यांच्या विवाह प्रमाणपत्राबाबत संशय येताच विशेष शाखेने याबाबत पालिकेच्या एल विभागाकडे चौकशी केली.
- तेव्हा, फराजने ऑनलाईन अर्ज केले असून नोंदणीसाठी आला नसल्याचे सांगितले. त्यानुसार, हे प्रकरण समोर आले.
तपास सुरू
व्हिसासाठी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यांचे लग्न झाले होते की नाही? हे कागदपत्रे कुठून व कसे बनवून घेतले? यामध्ये आणखीन किती जणांचा सहभाग आहे? याबाबत अधिक तपास सुरू आहे. त्यानुसार, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. - मनोज पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ५