खळबळजनक! खोटी नर्स बनून 'ती' सरकारी रुग्णालयात आली अन् नवजात बाळाला पळवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 02:37 PM2023-07-29T14:37:48+5:302023-07-29T14:38:44+5:30
सरकारी रुग्णालयातील एका खोट्या नर्सने वॉर्डमध्ये घुसून नवजात बाळाचे अपहरण केले. त्यानंतर ती तेथून पळून गेली.
राजस्थानमधील जयपूरमध्ये नवजात बाळ चोरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे सरकारी रुग्णालयातील एका खोट्या नर्सने वॉर्डमध्ये घुसून नवजात बाळाचे अपहरण केले. त्यानंतर ती तेथून पळून गेली. मात्र पोलिसांच्या हुशारीमुळे बाळाचा शोध लवकरात लवकर घेण्यात आला. त्याचवेळी आरोपी महिलेलाही अटक करण्यात आली.
जयपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात ही घटना घडली आहे. दौसा जिल्ह्यातील गांगलियावास येथील रहिवासी कलावती 27 जुलैच्या रात्री तिच्या नवजात बाळासह बेडवर झोपली होती. त्यानंतर रात्री 8.45 च्या सुमारास एक संशयित महिला वॉर्डमध्ये आली.तिथे तिने नवजात बाळाच्या आजीला आपण नर्स असून तिला पोलिओचं लसीकरण करायचे असल्याचे सांगितले.
मुलाच्या आजीने त्या खोट्या नर्सच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बाळाला तिच्या स्वाधीन केले. मात्र खोट्या नर्सने मुलाला घेऊन जाण्यास सुरुवात करताच आजीला संशय आला. ती म्हणाली की ती पण तिच्यासोबत येईल. मात्र नर्स आजीला चकमा देत तेथून गायब झाली.
आजीने रुग्णालयात जोरजोरात आरडाओरडा केल्यावर रुग्णालयातील कर्मचारी आणि लोकांची गर्दी झाली. घटनास्थळावरील रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पिवळ्या सलवार सूटमध्ये एक महिला नवजात बाळाच्या आजीशी बोलताना आणि रुग्णालयातून बाहेर पडताना दिसली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून मुलाचा शोध सुरू केला.
डीसीपी पूर्व ज्ञानचंद यादव यांनी सांगितले की, रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये महिला मुलाला उचलून एसयूव्ही कारमधून निघताना दिसत आहे. पोलिसांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. तेव्हाच समजले की, आरोपी महिला बस्सीहून कनोटा मार्गे जयपूर शहराच्या दिशेने मुलाला घेऊन जात होती, रिंग रोडवर पोलिसांनी नाकाबंदी केल्याचे पाहून ती घाबरली आणि मुलाला गाडीत टाकून पळू लागली. मात्र पोलिसांनी तिला अटक केली. आता पोलीस आरोपी महिलेची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.