बनावट फार्मसी कॉल सेंटरचा भांडाफोड, अमेरिकन नागरिकांना विकत होता व्हायग्रा
By पूनम अपराज | Published: November 25, 2020 04:49 PM2020-11-25T16:49:25+5:302020-11-25T16:50:03+5:30
Fake pharmacy call center busted : त्याच्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या ११ जणांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात येणार आहे.
मुंबईतील मालाड येथील बनावट फार्मसी कॉल सेंटरला मुंबईपोलिसांनी भांडाफोड केला आहे. अमेरिकेत बंदी असलेली औषधे देण्याचे आमिष देऊन अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका ३८ वर्षीय अकाऊंटटला मुंबई क्राईम ब्रांच युनिट ११च्या पोलिसांनीअटक केली आहे. विशाल घनश्याम सोनी असं या आरोपीचं नाव आहे. तसेच त्याच्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या ११ जणांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात येणार आहे.
मालाड येथील लिंक रोडवर विशाल घनश्याम सोनी याने आपल्या कार्यालयात बोगस कॉल सेंटर थाटले होते. बोरिवलीतील चिकूवाडी येथे राहणाऱ्या सोनीने लॉकडाऊनचे नियम शिथिल करून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे फेक फार्मसी कॉल सेंटर थाटले. याबद्दल गुप्त माहिती खबऱ्याकडून मुंबई क्राईम ब्रांचला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी विशाल सोनीच्या कार्यालयावर सोमवारी रात्री छापा टाकला. यावेळी कार्यालयामध्ये अनेक लोकं फेक कॉल करताना आढळून आले. पोलिसांनी विशाल सोनीला ताब्यात घेतले आहे.
फायनान्स अँड अकाउंटिंगमध्ये पदवीधर असलेल्या सोनीकडे रात्री ११ जण त्याच्याकडे अकाउंटन्सी फर्ममध्ये दिवसा काम करत होते. रात्रीच्या वेळी ते बनावट ओळख निर्माण करून कॉल सेंटरमध्ये त्याच्यासाठी काम करत असत. आरोपी सोनी हा त्याच्या टीमकडून अमेरिकन नागरिकांना फोन करून व्हायग्रा, सियालिस आणि लेवित्रा यासारख्या लैंगिक समस्याच्या गोळ्या देण्याचे खोटे आश्वासन देत होता. या औषधांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे.
सोनीची गॅंग अमेरिकन नागरिकांना आपण अमेरिकेतून बोलत आहोत, असं भासवत होते. अमेरिकन लोकांच्या शैलीत ते त्यांच्याशी संवाद साधत होते. त्यामुळे समोरील व्यक्तीचा विश्वास बसल्यानंतर ते ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सोनीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई मिररने दिली आहे.