देशी बनावटीची पिस्तुले, कट्टे, काडतूस हस्तगत : आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:51 PM2019-09-05T13:51:47+5:302019-09-05T13:52:31+5:30
आरोपी पिस्तुले विक्रीसाठी दिघीतील मॅग्झीन चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पिंपरी : पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून चार पिस्तुले व १५ काडतुसे जप्त करण्यात आली. सराईत गुन्हेगारांना ही पिस्तुले व काडतुसे विकणार असल्याचे आरोपीने कबूल केले आहे. गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने दिघी येथे मंगळवारी (दि. ३) ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्दार्थ ऊर्फ रौनक रिपुरमन शर्मा (वय २२, रा. दिघी, मुळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शर्मा हा पिस्तुले विक्रीसाठी दिघीतील मॅग्झीन चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्यास शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे दोन पिस्तुले व देशी बनावटीचे दोन कट्टे व १५ जिवंत काडतुसे मिळून आली. सराईत गुन्हेगार बाबा पांडे व सॅन्डी गुप्ता (दोघे रा. भोसरी) यांच्या सांगण्यावरून बिहार येथून ही पिस्तुले, कट्टा व काडतुसे आणल्याचे आरोपी शर्मा याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी शर्मा याला अटक करण्यात आली.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस हवालदार राहुल खारगे, विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, हजरत पठाण, पोलीस नाईक सचिन मोरे, जमीर तांबोळी, योगेश आढारी, नाथा केकाण, अरुण नरळे, योगेश्वर कोळेकर, पोलीस कर्मचारी त्रिनयन बाळसराफ, महेश भालचिम, राजकुमार हनमंते व सागर जैनक यांच्या पथकाने कारवाई केली.