प्लॉटचे बनावट कागदपत्र बनवले अन् दोघांना ४४.५० लाखांची केली फसवणूक!
By दयानंद पाईकराव | Published: October 28, 2023 04:51 PM2023-10-28T16:51:38+5:302023-10-28T16:51:47+5:30
संजय कृपालसिंग भोसले (वय ५३, रा. सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स) आणि सुमित्राबाई श्रीराम गाणार (वय ६४) रा. अजनी चौक, वर्धा रोड) अशी आरोपींची नावे आहेत.
नागपूर : प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करून दोन आरोपींनी एका महिला आणि पुरुषाला ४४.५० लाखांनी गंडविल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संजय कृपालसिंग भोसले (वय ५३, रा. सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स) आणि सुमित्राबाई श्रीराम गाणार (वय ६४) रा. अजनी चौक, वर्धा रोड) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी २ फेब्रुवारी २०१९ ते २७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान मंजुलता शिवकुमार सिंग (वय ५९, रा. फ्रेंड्स कॉलनी काटोल रोड) आणि त्यांच्या ओळखीचे सुमंतसिंग राजकुमार ठाकूर (वय ४३, रा. काटोल रोड) यांना विश्वासात घेतले. आरोपींनी गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत होमलेस को-ऑप. सोसायटी मानवसेवानगर अंतर्गत तेलंगखेडी येथील प्लॉट नं. ७९ आणि ८० चे खोटे कागदपत्र तयार केले.
आरोपींनी मंजुलता यांना २२.५० लाखात व सुमंतसिंग यांना २२ लाखात प्लॉटची विक्रि केली. परंतु आरोपींनी प्लॉटची रजिस्ट्री करून न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी मंजुलता सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ४०६, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.