पोलीस असल्याची बतावणी करणारा निघाला तडीपार गुंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 06:53 AM2019-08-17T06:53:39+5:302019-08-17T06:54:09+5:30
पोलीस असल्याचे सांगत नौपाड्यातील हॉटेलचालकाकडून २० हजारांची खंडणी उकळणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.
ठाणे : पोलीस असल्याचे सांगत नौपाड्यातील हॉटेलचालकाकडून २० हजारांची खंडणी उकळणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. धनाजी दळवी (२७, रा. मुरबाड, ठाणे) असे आरोपीचे नाव असून याच्याविरुद्ध फसवणुकीसह गुन्हे दाखल आहेत.
धनाजीसह अभिजित उतेकर (२७, रा. खडकपाडा, कल्याण), समीर वडवले (२५, रा. मुरबाड, ठाणे) आणि परेश पाटील (२४, रा. चेंबूर, मुंबई) यांना नौपाडा पोलिसांनी ६ आॅगस्ट रोजी अटक केली. या चौघांनाही १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
‘हाउस आॅफ मोमोज’ या हॉटेलमधून दळवीने पोलीसाच्या गणवेशात ५ आॅगस्ट रोजी खाण्याचे पार्सल खरेदी केले. त्याने पार्सलमध्ये स्टॅपलरची पिन टाकून आपण पोलीस असल्याची बतावणी केली. तर, त्याचे साथीदार तिथे आले. त्यांनी मालक वरुण कपूर (३४) यांना ‘तुमच्या मोमोजमध्ये स्टॅपलरची पिन आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करण्यासाठी आल्याचे सांगून नोकराला बेड्या ठोकल्या. कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडे २० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती सात हजार कपूर यांनी सोपवल्यानंतर नौपाड्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने त्यांना अटक केली.