तोतया ठाणेदार गजाआड! जनतेला गंडा घालणाऱ्या विदर्भातील लखोबा लोखंडेला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 21:43 IST2019-07-12T21:42:27+5:302019-07-12T21:43:01+5:30
महाराष्ट्रातील जनतेला गंडा घालणाऱ्या विदर्भातील लखोबा लोखंडेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

तोतया ठाणेदार गजाआड! जनतेला गंडा घालणाऱ्या विदर्भातील लखोबा लोखंडेला बेड्या
गोंदिया - प्र.के.अत्रे रचित नाट्यप्रयोगातील महाठग लखोबा लोखंडे हा अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कल्पना शक्तीच्या पलीकडील तो अभिनय प्रत्यक्षात अनुभवास येऊ शकतो याची कल्पनाही अंगावर शहारे करून जाते. असाच काहीसा अनुभव प्रत्यक्षात अनुभव अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अटक केलेल्या विनायक काशीनाथ बोरकर या अविलया महाठगाची कहाणी ऐकल्यावर आला. अर्जुनी मोरगावचे पोलीस निरीक्षक महादेव तोंडले यांनी १२ जुलै रोजी सकाळी ६.२५ वाजता गुप्त माहितीच्या आधारावर धाड टाकून विनायक बोरकरला अटक केली.
प्राप्त माहितीनुसार विनायक बोरकर हा चंद्रपूर जिल्ह्यातील मुल मारोडा येथील असल्याचे सांगतों. तालुक्यातील कन्हाळगाव येथील प्रशांत सोनवणे यांच्याकडे ३ मार्च २०१९ पासून तो भाडयाने राहायचा. कित्येक दिवस हा गैरहजर असायचा, नवनवीन व्यक्ती त्या रूमवर येऊन विचारणा करायचे, एकंदरीत या इसमच्या हालचाली घरमालकाला संशयास्पद वाटल्याने त्याची माहिती पोलीसांना दिली. माहितीच्या आधारावर अर्जुनी पोलिसांनी पाळत ठेवून १२ जुलै रोजी त्याला अटक केली. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी भांदवी कलम १७०,१७१ अन्वये गुन्हा दाखल केला असून १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे.
तोतयागिरी करत जमवली माया
आज सदू, उद्या विनायक, तर कधी राजेश असे अनेक नाव,गाव बदलवून अवघ्या महाराष्ट्रात आपल्या तोतयागिरीने अनेकांची दिशाभूल करत आर्थिक लुबाडणूक करणारा लखोबाला शुक्रवारी (दि.१२) अर्जुनी मोरगाव पोलिसांनी सापळा रचून तालुक्यातील कन्हाळगाव येथे पकडले. आरोपीचे नाव विनायक काशिनाथ बोरकर वय वर्ष ४५ मु.मारोडा ता. मुल जि. चंद्रपूर असे सध्या सांगितले. रेल्वेने चंद्रपूर-गोंदिया या मार्गाने प्रवास करतांना या परिसरात आपले जाळे रोवण्याचे मनसुबे बनवून त्याने कान्हाळगाव येथील एकाच्या ओळखीने माझी परिस्थिती बरी नाही, मला काही रोजगार व तुझ्या गावात राहायला खोली बघून दे असे सांगून मागील अनेक दिवसांपासून कन्हाळगाव येथे वास्तव्यास होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्या खोलीची झडती घेतली असता अनेक गोष्टी समोर आल्या त्या बघून पोलिसांचे देखील धक्का बसला. त्यांनी बरीच माया जमविली आहे.
झडतीमध्ये मिळालेले साहित्य
आरोपी राहत असलेल्या खोलीची पोलिसांनी चौकशी केली असता ज्या गोष्टी समोर आल्या त्या बघून हा केवळ जिल्ह्यातीलच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला लुबाडणारा फसवणारा लखोबा लोखंडे असल्याचे समोर आले. चौकशीत राजमुद्रा असलेली सहाय्यक पोलीस निरीक्षकाची वर्दी, पोलीस शिपायाची १ वर्दी पोलीस अधीक्षक आवाकजावक मुद्रण ३० शिक्के, फौजदारी कायदे पुस्तके, अमरावती, अकोला, औरंगाबाद जिल्हा पोलीस भरती २०१८ चे २६ प्रवेश पत्र,महाराष्ट्र पोलीसांचे ३ ओळखपत्र, महाराष्ट्र पोलीस फिटनेस २९ प्रमाणपत्र,१ बाहेरगाव ड्युटी पास, तर ६ आधारकार्ड, १ मतदान ओळखपत्र, पोलीस अधीक्षक सेवेचे ३ लिफाफे, सोन्याचे दागिने, नगदी रोख १९००० रुपये सापडले.
महाराष्ट्रातील अनेक ठाण्यात गुन्हे दाखल
या महाभागाने ज्या ठिकाणी आपली जाळे रोवले त्यात आपली ओळख बदलून, प्रस्थ निर्माण केले, त्यात हौस भागली किमया साधली की तिथून पोबारा करायचा, मिळालेल्या माहितीनुसार अनेक महिला,मुलींना देखील आपल्या शिताफीने जाळ्यात अडकविल्याची माहिती आहे.याबाबत महाराष्ट्रातील अनेक ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचीही माहिती आहे.