खंडणी उकळणारा तोतया पोलीस जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 01:54 AM2020-07-07T01:54:53+5:302020-07-07T01:55:21+5:30
खारेगाव टोलनाक्यावर एक टोळी मुंबई पोलिसाच्या मदतीने वाहनचालकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना मिळाली होती.
ठाणे : मुंबईच्या साकीनाका येथील कोरोना संशयित पोलिसाच्या मदतीने ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथे वाहनचालकांकडून खंडणी उकळणाऱ्या अमोल देवळेकर (४४, रा. भिवंडी, ठाणे) या तोतया पोलिसाला कळवा पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून एका कारसह बनावट ओळखपत्र, पोलीस अधिकाºयाची टोपी, पाच हजारांची रोकड व मद्याच्या बाटल्यांचा बॉक्स असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
खारेगाव टोलनाक्यावर एक टोळी मुंबई पोलिसाच्या मदतीने वाहनचालकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी सापळा लावून कारवाईचे आदेश कळवा पोलिसांना दिले होते. त्यानुसार कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील घोसाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर आणि पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे आदींच्या पथकाने ५ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून तोतया पोलीस अमोल याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याला अटक केली. मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाईही त्याच्याबरोबर सक्रीय होता, अशी माहिती त्याने दिली. दरम्यान, कोरोना संशयित पोलीस हवालदाराने या खंडणीसाठी मदत केल्याचे उघड झाल्याने या प्रकरणात त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
मद्याची वाहने हेरायचे
अमोल आणि कोरोना संशयित असलेला मुंबई वाहतूक शाखेचा पोलीस भिवंडीच्या मानकोलीतून मद्य घेऊन जाणाऱ्यांना हेरायचे.
ठाणे व भिवंडीत जाणारी काही मद्याची वाहनेही ते अडवीत असत. त्यांच्याकडून पाच ते दहा हजारांपर्यंत खंडणी गोळा करून प्रकरण मिटवत होते.