प्रेमी युगुलांकडून पैसे उकळणाऱ्या तोतया पोलिसांना अटक
By पूनम अपराज | Published: April 8, 2019 11:30 PM2019-04-08T23:30:01+5:302019-04-08T23:35:02+5:30
संदेश मालाडकर (44) आणि सचिन खारवी (37) असे अटक आरोपींची नावे आहेत.
मुंबई - गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून प्रेमी युगूलांकडून पैशाची मागणी करणाऱ्या दोन तोतया पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात मालाड पोलिसांना यश आलं आहे. आरोपी पीडित युगुलांना पळत ठेवून त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करायचा. संदेश मालाडकर (44) आणि सचिन खारवी (37) असे अटक आरोपींची नावे आहेत.
यातील आरोपींपैकी मालाडकर हा नालासोपारा तर खारवी हा ठाण्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी एका फरार आरोपीची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून त्याचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींना याप्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी नुकतीच एका दुकानदाराला टार्गेट केले होते. दुकानदार त्याच्या प्रेयसीसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथून परतत असताना आरोपींनी त्याला रस्त्यात अडवले. आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असून महिलेसोबत काय करतोस? तुझ्या पत्नीचा मोबाईल क्रमांक दे, तिला माहिती देतो, असे धमकावले. तसेच 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी दुकानदाराने त्यांना 12 हजार रुपये दिले व उर्वरीत रक्कम नंतर देण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी हा प्रकार हॉटेल मालकाला सांगितला. मात्र, बदनामीच्या भीतीने हा प्रकार त्याने पोलिसांना सांगितला नाही.
त्यानंतर हॉटेल मालकाने या संशयीतांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. त्यावेळी रविवारी हॉटेलसमोर संशयित आल्यानंतर हॉटेल मालकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस पथकाने येऊन सापळा रचला व आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांनी या पद्धतीने 9 ते 10 प्रेमी युगुलांना लक्ष्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.