तो तोतया ठाणेदार विनायक नव्हे, तर भंडाऱ्याचा विलास, तपासात धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 08:24 PM2019-07-13T20:24:02+5:302019-07-13T20:24:13+5:30
बनावटी नाव धारण करुन महाराष्ट्रात तोतयागीरी करणा-या महाठगाने पोलिसांनाही चक्रावून सोडले आहे.
अर्जुनी-मोरगाव - बनावटी नाव धारण करुन महाराष्ट्रात तोतयागीरी करणा-या त्या महाठगाने पोलिसांनाही चक्रावून सोडले आहे. शुक्रवारी त्याने खोटे नाव सांगितले होते. त्याचे खरे नाव विलास गणवीर रा.मोखे किन्ही ता.साकोली जि. भंडारा असे असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. या महाठगाने विविध ठिकाणी गंडा घातला मात्र वेगवेगळ्या नावाने अनेक ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हिंदी चित्रपटातील कथानकाला लाजवेल असा जिवंत अभिनय करीत शेकडो बेरोजगार युवकांना नोकरीच्या आमिषाने ठगविले. कित्येक महिलांचे जीवन या तोतया ठाणेदाराने उध्वस्त केल्याची माहिती आहे. अशा शुक्रवारी अटक तोतया ठाणेदाराची खरी ओळख आज अर्जुनी मोरगाव पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीनुसार शनिवारी पोलीस उपनिरीक्षक शेवाळे यांचा ताफा आरोपीला घेऊन त्याचे भंडारा जिल्ह्यातील मूळ गावी मोखे किन्ही येथे दाखल झाला.
यात तपासात आश्चर्यजनक माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी विलास गणवीर हा लहानपणापासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची बाब पुढे आली. लहानपणी कोंबड्या बक-या चोरी करणारा आता अट्टल गुन्हेगार झाला आहे. शनिवारी त्याला त्याच्या मूळ गावी नेले असता त्यांना स्वत:चा भाऊ आणि वहिनीला सुध्दा ओळखत नसल्याचे नाटक केले. मात्र गावातील सगळ्यांनी त्याला ओळखले मात्र यानंतरही त्यांने तो मी नव्हे अशी भूमिका घेतली होती. या महाठगाने महाराष्ट्रात अनेक लोकांना गंडा घातला.अनेक ठिकाणी वेगळया वेगळ्या नावाने त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.तपासात आणखी मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे. शनिवारी अर्जुनी पोलिसांनी त्याच्या खोलीतील दिवाण, सोफा, आलमारी जप्त केली. आरोपीला १५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी आहे. आणखी कुठे कुठे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार महादेव तोंदले यांनी दिली.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महादेव तोदले, पोलीस उपनिरीक्षक देविदास शेवाळे, सपोनि मनोहर बुराडे, पोहवा सोनावणे, विजय कोटांगले,ज्ञानेश्वर बोरकर करीत आहेत .
स्वत:ची वकीली स्वत:च
विलास गणवीर हा ७ वर्ग शिकलेला असून लोकांना फसविण्यात त्याचा हातखंडा असल्याचे बोलल्या जाते. त्याची गंडा घालण्याची अफलातून पद्धत, कायद्याची जाण, कार्यालयीन भाषेची पुरेपूर माहिती हे सगळेच आश्चर्यकारक आहे. तो कधीच कोर्टात वकील करीत नाही स्वत:ची केस स्वत:च लढतो हे विशेष.
जी गाव तितकीच नाव
विलास गणवीर महाराष्ट्रातील विविध गावात वास्तव्याला होता. या दरम्यान त्यांने गाव बदलले की आपले नाव बदलविण्याचा फंडा आजमाविला होता.यामुळे महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या नावाने त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.