नकली पोलिसाला अटक, अनेकांना फसविल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 06:26 PM2024-05-28T18:26:03+5:302024-05-28T18:26:57+5:30
वसईतील महेंद्रकुमार पुरोहीत या फिर्यादीचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा : वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी मोबाईल चोरीच्या प्रकरणात अटक केलेला एक आरोपी नकली पोलीस बनून वावरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पोलिसांच्या गणवेशाषह पोलिसांच्या वापरातील विविध ३० वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकलही केली आहे.
वसईतील महेंद्रकुमार पुरोहीत या फिर्यादीचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून काही दिवसांपूर्वी एका इसमाने १ लाख ६० हजारांचा मोबाईल फोन विकत घेतला होता. मात्र आरोपीने १ लाख १० हजार एनईएफटी केल्याचा बनावट मेसेज दाखवून फिर्यादीची दिशाभूल केली तसेच ५० हजारांचा दिलेला धनादेश वटला नव्हता.या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला होता. वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकऱणी फैजल अबुल हसन शेख (२८) या आरोपीला अटक केली. यापूर्वी देखील आरोपीने अशाच प्रकारे फसवून दुचाकी विकत घेतली होती.
मात्र तपासात तो नकली पोलीस म्हणून वावरत असल्याचे आढळून आले. पोलीस निरीक्षक दर्जाचा पोलीस अधिकारी वापरत असलेले ३ खाकी गणवेश, १ पिकॅप, ३ गोल बॅरी कॅप, मुंबई पोलीस नाव असलेली गोल टोपी, एक हाथकड़ी (बेडी), लाल रंगाचा बेल्ट स्टीलचे बक्कलसह, उच्चप्रतीची एअरगण, पोलीस निरीक्षकाचे स्वतःचे नावे पोलीस विभागाचे ओळखपत्र, तसेच स्कॅन करुन तयार केलेले पोलीस शिपाई पदाचे नियुक्ती पत्र अशा एकुण ३० पेक्षा अधिक पोलीस विभागाशी निगडीत असलेल्या वस्तू मिळून आलेल्या आहेत. त्यामुळे तो नकली पोलीस बनून वावरत असल्याचे निष्पन्न झाले. त्याने पोलीस बनून कुणाची फसवणूक केली का त्याचा पोलीस तपास करत आहेत.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त र्पोणिमा श्रींगी-चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सैय्यद जिलानी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालादर मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी केली आहे.