पोलीस निरीक्षकाचीच उलट तपासणी आली अंगाशी, तोतया पोलिसाला चांगलाच महागात पडला पंगा 'खाकीवर्दी'शी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 02:45 PM2020-06-22T14:45:24+5:302020-06-22T15:45:02+5:30
हे चौधरी साहेब,खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आहेत. यांना ओळखत नाही काय?
राजगुरुनगर: पोलीस असल्याची बतावणी करत व पोलिसांचा यूनिफॉर्म परिधान करून तोतयागिरी केल्याप्रकरणी खेडपोलिसांनी तोतया पोलिसाला जेरबंद केले आहे. जयदीप नवीनकुमार शहा(वय २०, सध्या. रा. चाकण, ता खेड , मूळ गाव, अकोले जि. अहमदनगर) असे तोतया पोलिसाचे नांव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी हे साध्या वेशात मित्राबरोबर गुळाणी घाट येथे फिरायला गेले होते. रस्त्यालगत झाडाखाली बसुन भेळ खात असताना जयदीप नवीनकुमार शहा हा तोतया पोलिस व त्यांचा मित्र हे दोघे जण गुळाणीवरून दुचाकीवरून येत होते. दुचाकी थांबवुन पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी व मित्रांना तोतया पोलिसाने विचारले, ‘तुम्ही इथे काय करता दारू पिता आहे काय, दारू कुठे लपवून ठेवली ते सांगा’.. तोतया पोलिसाच्या अंगावर ट्राफिक पोलिसांचा युनिफॉर्म परिधान केला असल्याने व त्यावर महाराष्ट्र पोलिस नावाचे जर्किंग व डोक्यात कॅप असल्याने चौधरी यांनी तोतया पोलिसाला विचारले की, तु कुठल्या पोलीस ठाण्यात काम करतो, त्यावर त्यांने सांगितले मी चाकण येथे काम करत आहे. दरम्यान चौधरी यांच्या मित्रांनी तोतया पोलिसाला सागितले, हे चौधरी साहेब,खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आहेत. यांना ओळखत नाही काय ? त्यावर तोतया पोलिसाने म्हटले ‘साहेब, तुम्ही पण का’ असे म्हणून एक सॅल्युट मारून तेथुन पळ काढला. चौधरी यांना तोतया पोलिस असल्याची शंका आल्याने त्यांनी खेड पोलीस ठाण्यात फोन केला. एक तोतया पोलिस खेडच्या दिशेने येत आहे. त्याला ताब्यात घेऊन नक्की पोलीस आहे काय याबाबत चौकशी करा. तात्काळ पोलिस हवालदार तान्हाजी हगवणे, संतोष मोरे, कोमल सोनुमे यांनी सापळा रचुन राक्षेवाडी येथील गणपती मंदिरासमोर दुचाकी वर येत असताना तोतया पोलिसाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवत कसुन चौकशी केली असता पोलीस असल्याची खोटी बतावणी करून पोलिस युनिफॉर्म परिधान करून तोतयागिरी करत असल्याचे सांगितले. शहा हा चाकण ते भोसरी येथे रिक्षा चालविण्याचे काम करत तो पोलिसांचा फॅन असल्याचे सांगतो .त्याने पुणे येथून एक ट्रॉपिक पोलिस गणवेश शिवून घेतला होता. तो परिधान करत फिरत होता. गणवेशावर लावलेली नेमप्लेट सापडली असल्याचे सांगितले. यापूर्वी चाकण परिसरात येथेही दोन रिक्षाचालकांना जास्त प्रवाशी भरता म्हणून त्यांना गुन्हे दाखल करण्यांची धमकी देऊन प्रत्येकी दोनशे रुपये शहा याने घेतले होते. या सर्व प्रकाराबाबत पोलीस हवालदार कोमल तोताराम सोनुने यांनी खेड पोलीस ठाण्यात शहा यांच्या विरोधात फिर्याद दिली असून अटक केली आहे.