पैशांसाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, पाच तासांत गुन्ह्यांची केली उकल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 11:39 AM2023-06-02T11:39:04+5:302023-06-02T11:41:21+5:30
कामावरून सुटलेला मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला...
मुंबई : कामावरून सुटलेला मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. काही तासांत मुलगा सुखरूप हवा असल्यास पाच लाखांच्या मागणीचा कॉल आला. या घटनेने खळबळ उडाली. बांगूर नगर पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके कामाला लावून तरुणाचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांतच गुन्ह्याची उकल करत तरुणाची सुटका करण्यास त्यांना यश आले. तपासात, वडिलांकडून पैसे काढण्यासाठी मुलानेच अपहरणाचा बनाव केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दहीसर परिसरात राहणारे तक्रारदार दिनेशलाल नारायण जोशी (४८) यांचा दूधविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा जितेंद्र जोशी (२७) हा मंगळवारी रात्री गोरेगाव लिंकरोड येथून कामावरून घरी निघाला. मात्र बराच वेळ झाला तरी घरी परतला नाही. त्यानंतर, रात्री दोनच्या सुमारास जितेंद्र यांच्या पत्नीच्या मोबाइलवर व्हॉट्स ॲप कॉल आला. मुलाच्या सलामतीसाठी बुधवारी सायंकाळी ७ पर्यंत पाच लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास व पोलिस व इतर कोणाला कळविल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
जोशी कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. वेगवेगळी तपास पथके तयार करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुलाच्या मोबाइल लोकेशन तसेच त्याचा येण्याच्या जाण्याच्या मार्गावरील जवळपास १०० सीसीटीव्ही तपासले. अवघ्या काही तासांत त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. तपासात त्यानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर येताच त्याला अटक करण्यात आली आहे.
असा रचला कट
जितेंद्रकडे केलेल्या चौकशीत, त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कामगाराला जितेंद्र जोशी यानेच ४ ते ५ दिवसांपूर्वी तो एका अडचणीत असल्याचे सांगितले.
त्यातून सुटण्यासाठी त्याचे स्वतःचे अपहरण करून वडिलांकडून पैसे वसूल करण्याबाबत कट आखला.
यामध्ये मदत न केल्यास त्याची नोकरी घालविण्याची धमकी दिल्याने त्याने त्याला मदत करण्याचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे दि. ३१ मे रोजी जितेंद्र कामावरून सुटल्यानंतर त्याने मित्राकडून पत्नीला फोन लावून वडिलांकडून पाच लाख रुपये आणून देण्यास सांगितले.