युवकाच्या आत्महत्येचा बनाव; गळा आवळून खून केल्याचे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 06:45 PM2023-09-01T18:45:22+5:302023-09-01T18:45:26+5:30
भंडारज खुर्द येथील घटना : मृतकाची पत्नी व पोलिसांची सतर्कता, याप्रकरणी पातूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला
अकाेला : तालुक्यातील भंडारज खुर्द येथे एका ३६ वर्षीय युवकाच्या आत्महत्येचा बनाव केला होता. परंतु, मृताची पत्नी व पोलिसांच्या सतर्कतेने बनाव उघडकीस आला असून, शवविच्छेदन अहवालात युवकाचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पातूर पोलिसांनी शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक केली.
पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द येथील मिलिंद तुळशीराम इंगळे (३६) यांनी बुधवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती माहेरी रिसोड येथे गेलेल्या त्यांच्या पत्नीला कळविण्यात आली. मृतकाची पत्नी परतल्यानंतर तिला संशय आला. त्यामुळे तिने पातूर पोलिसांना सोबत घेऊन गाव गाठले. मात्र, ती गावात पोहोचण्याच्या आधीच मृतावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंब व गावातील लोकांनी केली. परंतु, अंत्यसंस्काराच्या वेळेवर बुधवारी सायंकाळी मृताची पत्नी पोलिसांना घेऊन पोहोचल्याने अंत्यसंस्कार रोखण्यात आले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर मिलिंद इंगळे यांनी आत्महत्या केली नसून त्यांना मारहाण करून गळा आवळून खून केला व फासावर लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव केला, ही बाब स्पष्ट झाली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार किशोर शेळके, पोलिस उपनिरीक्षक मीरा सोनुने, गजानन मानकर, दिलीप इंगळे, संबोध इंगळे, सत्यजित ठाकूर, निलेश राठोड यांनी केली.
शेती आणि घराचा वाद
आरोपी संजय मोतीराम इंगळे (५२) व त्याची पत्नी ज्योती संजय इंगळे (४७) रा. भंडारज खुर्द यांना मृत मिलिंद इंगळे यांच्या कुटुंबाकडे असलेली एक एकर शेती हवी होती. ती मृताने देण्यास नकार दिला होता. तसेच मृतकाच्या पक्क्या घरात आरोपी कुटुंबासह राहत होता. ते घरही त्यांना हवे होते. मात्र, याच घरामध्ये मिलिंद इंगळे हा ७ ते ८ दिवसांआधी राहायला आला होता. याचा राग मनात धरून आरोपींन संगनमत करून गळा आवळून खून केल्याचे आरोपींनी जबाबात सांगितले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत स्मशानभूमीत घेऊन गेले होते. मात्र, हा बनाव असफल ठरला.
खुनाचा गुन्हा दाखल
आरोपीस खरी परिस्थिती माहिती असताना त्याने ३१ ऑगस्ट रोजी पोलिसांना खोटा जबाब दिल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर आता आरोपीविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपींना अटक केली.