खानावळीत असताना जुळले प्रेम; पतीने केला प्रियकराचा गेम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 11:12 PM2020-02-09T23:12:09+5:302020-02-09T23:26:17+5:30

अनैतिक संबंधांतूनच राजीवची हत्या झाल्याचा संशय बळावल्यानंतर, पोलिसांनी उत्तमला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

fall in Love at hotel; Husband killed her lover | खानावळीत असताना जुळले प्रेम; पतीने केला प्रियकराचा गेम

खानावळीत असताना जुळले प्रेम; पतीने केला प्रियकराचा गेम

Next

एक तरुण बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी शिताफीने तपास करत, बेपत्ता तरुणाची हत्या करण्यात आल्याचे उघड केले. राजीव ओमप्रकाश बिडलान (२५) या तरुणाचे खानावळीत काम करणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. यातूनच तिच्या पतीने मित्रांच्या मदतीने राजीवची हत्या केली होती.


२३ आॅक्टोबर रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार महिला पोलीस उपनिरीक्षक मंजुषा शेलार यांनी पोलीस नाईक धनंजय सोनावळे यांना फोन केला. एक तरुण बेपत्ता झाल्याची नोंद दाखल करण्यात आल्याचे सांगत, याचा तपास आपणाकडे सोपविल्याचे त्यांनी सोनावळे यांना सांगितले. सोनावळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणातून कामाच्या शोधात राजीव (२५) कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा येथील शिवाजीनगर परिसरात राहणाºया अजित (२९) या मोठ्या भावाकडे तीन वर्षांपूर्वी राहायला आला होता. एका खासगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणारा राजीव जोशीबाग परिसरात असलेल्या एका खानावळीत जेवण करण्यासाठी जात होता. याच खानावळीत काम करणाºया रूपा जैसवारसोबत राजीवची जवळीक निर्माण होऊन त्याचे प्रेमात रूपांतर झाले. काही दिवसांनंतर ही खानावळ बंद पडल्याने रूपाच्या घरी राजीवची खानावळ सुरू झाली. त्याचदम्यान राजीवने रूपा राहत असलेल्या गणेशनगर येथील घरात राहायला सुरुवात केली. डिसेंबर, २०१८ मध्ये रूपाचे पती संजित जैसवारसोबत भांडण झाले. भांडणानंतर संजितचे घर सोडून रूपा राजीवसोबत निघून गेली. त्यानंतर, दिल्ली येथे जाऊन राहिल्यानंतर दोघेही दोन महिन्यांनंतर पुन्हा रूपाच्या घरी परतले.


२१ आॅक्टोबरच्या रात्री ८.१०च्या सुमारास घराबाहेर पडलेला राजीव दोन दिवस होऊनही घरी परत न आल्याने, त्याचा भाऊ अजितने राजीव बेपत्ता झाल्याची तक्रार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दिली. ठाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये राजीवचे फोटो आणि वर्णन पाठवून माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली. तांत्रिक माहितीच्या आधारे भिवंडी तालुक्यातील वालशिंद येथे जाऊन राजीवचा शोध घेण्याचा पोलिसांनी केलेला प्रयत्न असफल ठरला. दरम्यान, राजीव राहत असलेल्या परिसरात चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना रूपा आणि राजीवच्या प्रेमसंबंधाची जुजबी माहिती मिळाली. त्याचबरोबर, डिसेंबर, २०१८ मध्ये रूपा आणि राजीव कल्याणमधून पळून जाऊन दिल्ली येथे राहायला गेल्याचे आणि काही दिवसांनी परतल्याचेही समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रूपाकडे राजीवच्या बेपत्ता होण्याबाबत अधिक विचारपूस केली. तेव्हा २१ आॅक्टोबरच्या रात्री ८.१०च्या सुमारास पती संजितने राजीवला फोन करून पार्टीसाठी घराबाहेर बोलावल्याचे तिने सांगितले. रात्री १.३०च्या सुमारास पती एकटाच घरी परतल्याने रूपाने त्याच्याकडे राजीवबाबत विचारपूस केली. राजीव कोठेतरी गेला असून, माहीत नसल्याचे संजितने यावेळी रूपाला सांगितले. राजीव बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर, संजित नोव्हेंबरपासून कोठेतरी निघून गेल्याची माहितीही रूपाने पोलिसांना दिली.


रूपाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आणखी तपास केला. चौकशीत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, २१ आॅक्टोबरच्या रात्री संजित आपल्या रिक्षातून राजीवला कल्याण तालुक्यातील रायता येथे घेऊन गेला. तिथे आधीपासूनच असलेला रूपाचा सावत्र भाऊ संदीप उर्फ बाळा गौतम, संजितचा पुतण्या उत्तम जैसवार आणि राहुल लोट या सर्वांनी मिळून राजीवला बेशुद्ध होईपर्यंत दारू पाजली. बेशुद्ध झालेल्या राजीवला सर्वांनी मिळून बेदम मारहाण केली. त्याला पुन्हा रिक्षात घालून कल्याणमध्ये आले. तेथे संदीप आणि राहुल दोघेही उतरले. त्यानंतर, संजित रिक्षा घेऊन भिवंडीच्या दिशेने निघाला. त्यावेळी त्याच्यासोबत उत्तमदेखील होता. रात्री ११.३०च्या सुमारास भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावाजवळील पाइपलाइनजवळ संजितने रिक्षा थांबविली. संजितने आपल्यासोबत आणलेल्या बर्फ तोडण्याचा टोचा राजीवच्या छातीमध्ये खुपसून त्याची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने राजीवचा मृतदेह खड्ड्यात फेकून दोघेही पसार झाल्याची माहिती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोनावळे यांना एका बातमीदाराने दिली.


ही माहिती सोनावळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांना दिल्यानंतर, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाला राजीवच्या मृतदेहाचा शोध घेण्यास सांगण्यात आले. या ठिकाणी शोध घेणाºया पथकाला १० डिसेंबर रोजी वालशिंद गावातील पंपहाउससमोर एका ठिकाणी सुकलेल्या झाडाच्या फांद्याचा ढीग दिसला. पथकाने जवळ जाऊन पाहिले असता, फांद्यांखाली एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरून, तसेच गळ्यातील बदामी आकाराच्या पॅडलवरून हा मृतदेह राजीवचा असल्याची खात्री पथकाला झाली. त्यानुसार, पोलीस नाईक सोनावळे यांच्या फिर्यादीवरून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


अनैतिक संबंधांतूनच राजीवची हत्या झाल्याचा संशय बळावल्यानंतर, पोलिसांनी उत्तमला चौकशीसाठी ताब्यात घेतले. २१ आॅक्टोबरच्या रात्री संजितने संदीप, राहुल यांच्या मदतीने राजीवची हत्या केल्याची धक्कादायक माहिती उत्तमने चौकशीदरम्यान दिली. राजीवच्या हत्येत सहभागी असलेल्या राहुल आणि संदीपलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य आरोपी संजितच्या मुसक्याही पोलिसांनी लवकरच आवळल्या.


या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांच्या संशयातून राजीवची हत्या करून पुरावा नष्ट करणाºया संजित जैसवारसह राहुल लोट (२२, रा. दिवा), संदीप उर्फ बाळा गौतम (२७, रा. मोठेगाव, डोंबिवली) आणि उत्तम जैसवार (२५, रा. चिकणघर, कल्याण) यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याणचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण, पोलीस नाईक धनंजय सोनावळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार जे. के. शिंदे, भालेराव, पोलीस नाईक कुंभार, सुनील भणगे, शिर्के, निकाळे, चौधरी, चित्ते, दळवी, संदीप भोईर, माने, पोलीस शिपाई दीपक सानप, पवार यांनी ही कामगिरी केली.


अनैतिक संबंधांतूनच राजीवची हत्या झाल्याचा संशय बळावल्यानंतर, पोलिसांनी उत्तमला चौकशीसाठी ताब्यात घेतले. २१ आॅक्टोबरच्या रात्री संजितने संदीप, राहुल यांच्या मदतीने राजीवची हत्या केल्याची धक्कादायक माहिती उत्तमने चौकशीदरम्यान दिली. राजीवच्या हत्येत सहभागी असलेल्या राहुल आणि संदीपलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य आरोपी संजितलाही अटक झाली़

 

Web Title: fall in Love at hotel; Husband killed her lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.