मृत पोलिसांच्या कुटंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही; हेमंत नगराळे यांनी दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 06:26 PM2021-02-25T18:26:29+5:302021-02-25T18:27:37+5:30
State DG Hemant Nagrale given assuarance : ३ दिवसांत १८३ पाल्यांना नोकरी
नागपूर - कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या ज्या पोलिसांचे निधन झाले त्यांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवघे पोलीस दलच मृत पोलिसांच्या परिवाराच्या पाठीमागे आहे. मृत पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस दलात सहभागी करून घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या तीन दिवसांत मुंबई, कोकण, ठाणे आणि नागपूर मध्ये १८३ जणांना नियुक्ती देण्यात आली, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) हेमंत नगराळे यांनी आज येथे पत्रकारांना दिली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार हजर होते.
नागपूर शहर आणि परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नगराळे बुधवारी रात्री नागपुरात आले. गुरुवारी सकाळी त्यांनी शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहर पोलीस दलाला येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोरोनाचे पुन्हा आव्हान ठाकले आहे. गेल्या वर्षी राज्यात ३३९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांचे जे नुकसान झाले ते कधीच भरून काढले जाऊ शकत नाही. मात्र, त्यांना शक्य होईल ती मदत केली जात आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस दलात अनुकंपा तत्वावर तातडीने सामावून घेण्याचे धोरण राबविले जात आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या तीन दिवसांत मुंबई आणि कोकण भागात ८३, ठाण्यात ७० आणि नागपुरात ३० जणांना नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. आता पोलिसांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून मुंबईत सकाळी आणि सायंकाळी अशा दोन शिफ्टमध्ये पोलिसांना कर्तव्यावर बोलविले जात आहे. हा निर्णय पोलीस महासंचालनालय, मुंबई पर्यंत मर्यादित आहे. ईतर ठिकाणी त्या - त्या ठिकाणचे आयुक्त आणि अधीक्षक सोयीनुसार निर्णय घेणार असल्याचेही नगराळे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या पोलिसांना कर्तव्यकठोर धोरण राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मकोका, एमपीडीए, तडीपारीसारखे जास्तीत जास्त निर्णय घेऊन सराईत गुंडांना कारागृहात डांबले जात आहे. अनेक योजना अंमलात आणल्या जात असून त्याचे परिणाम राज्यात लवकर बघायला मिळतील, असे ते म्हणाले. नागपुरात मध्यंतरी हत्येचे गुन्हे वाढले होते. आता अधिक कठोेर कारवाई केली जात असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे नगराळे म्हणाले. राज्यातील पोलीस दलाच्या अडचणीसंदर्भात प्रश्न केला असता त्यांनी राज्यात २० हजार पदे रिक्त असल्याचे सांगून वेलफेअर संबंधाने बरेच काही करायचे आहे, असे मत मांडले. पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झाला असता त्यावर त्यांनी आपले परखड मत मांडले. भ्रष्टाचाराचे समर्थन नाहीच. मात्र, भ्रष्टाचार हा यंत्रणेचा भाग बनल्याचे कटू वास्तव आहे. तो संपवण्यासाठी आवश्यक ती कठोर पावले उचलण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येकानेच ती किड नष्ट करण्यासाठी पुढे येण्याची गरज डीजीपींनी विशद केली.
पूजा चव्हाण प्रकरणात दबाव नाही
कोणत्याच प्रकरणाचा तपास सुरू असताना त्यावर भाष्य करणे योग्य नाही. त्याने तपास प्रक्रिया प्रभावित होऊ शकते. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाच्या संबंधाने आपण तूर्त काही बोलणार नाही. पुणे पोलीस या प्रकरणाचा कसून आणि योग्य पद्धतीने तपास करीत आहेत. चाैकशीत काय ते पुढे येईल, असेही ते म्हणाले. याप्रकरणात राजकिय दबावाचा मुद्दा नगराळे यांनी फेटाळून लावला. नक्षलवाद, भीमा कोरेगाव आदी प्रश्नांवरही त्यांनी जास्त बोलण्याचे टाळले.