टोरंटोमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या, मृतदेह आणण्याची दूतावासाकडे कुटुंबाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 10:05 PM2022-04-08T22:05:01+5:302022-04-10T20:04:58+5:30
Ghaziabad student shot dead in canada capital toronto : विद्यार्थ्याचा मृतदेह आणण्याची मागणी वडील आणि इतर कुटुंबीयांनी भारतीय दूतावासाकडे केली आहे.
कॅनडातील टोरंटो येथे ग्लोबल मार्केटिंगचा अभ्यास करणाऱ्या कार्तिक वासुदेव या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वडील हितेश वासुदेव यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी टोरंटोमधील एका रेस्टॉरंटबाहेर ही घटना घडली. कार्तिक बेपत्ता झाल्याची माहिती मित्रांनी कुटुंबीयांना दिली होती. विद्यार्थ्याचा मृतदेह आणण्याची मागणी वडील आणि इतर कुटुंबीयांनी भारतीय दूतावासाकडे केली आहे.
हितेश वासुदेव एका आयटी कंपनीत अभियंता आहे. त्यांनी सांगितले की, मुलगा कार्तिक 4 जानेवारी रोजी कॅनडातील टोरंटो येथे जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करण्यासाठी गेला होता. तो एका रेस्टॉरंटमध्ये अर्धवेळ नोकरीही करत होता. कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर तो थेट फ्लॅटवर पोहोचायचा आणि मग दुपारी रेस्टॉरंटमध्ये काम करायचा.
गुरुवारी तो रेस्टॉरंटमधून बाहेर पडला तेव्हा तो एका भुयारी मार्गाजवळ उभा होता. त्यानंतर एकाने विद्यार्थ्यावर गोळी झाडली. लोकांनी जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, तेथे त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांची अवस्था दयनीय झाली आहे. घरातील सदस्यांकडून फोनवरून घटनेची माहिती घेऊन शेजारी आणि नातेवाइकांचे सांत्वन केले जात आहे. हितेश वासुदेव सांगतात की, कॅनडाच्या पोलिसांशी संपर्क साधून ते भारतीय दूतावासाच्या मदतीने विद्यार्थ्याचा मृतदेह लवकरच घरी आणतील.