मंत्रालयात नोकरीचं दिलं प्रलोभन; ४.२० लाखांना गंडा, बनावट नियुक्तीपत्रही दिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 12:31 PM2022-02-26T12:31:55+5:302022-02-26T12:32:15+5:30

पाेलिसांकडून तिघांवर गुन्हे, दाम्पत्य फरार

family looted for 4 20 lakh for job in mantralaya fake appointment letter was also given police investigating | मंत्रालयात नोकरीचं दिलं प्रलोभन; ४.२० लाखांना गंडा, बनावट नियुक्तीपत्रही दिलं

मंत्रालयात नोकरीचं दिलं प्रलोभन; ४.२० लाखांना गंडा, बनावट नियुक्तीपत्रही दिलं

googlenewsNext

मीरा रोड : पत्नी मंत्रालयात असल्याचे सांगून मंत्रालयातीलनोकरीचे बनावट नियुक्तीपत्रे देऊन चार लाख २० हजार रुपयांना फसवणाऱ्या दाम्पत्यासह त्यांच्या साथीदारावर भाईंदर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दाम्पत्याने अनेकांना फसवले असल्याची शक्यता आहे. 

भाईंदर पश्चिमेच्या मुर्धा गावात राहणारा निकी भोईर (३०) उत्तन येथील बँड पथकात याची सागर कासारे याच्याशी ओळख झाली. राई येथे राहणाऱ्या सागरने २०१९ मध्ये त्याची पत्नी प्रीती मंत्रालयात कामाला असल्याचे सांगितले. निकीने त्याला नोकरी बघण्यास सांगितले. मंत्रालयात नोकरीसाठी एक लाख २० हजार खर्च आहे. सुरुवातीला ८० हजार द्यावे लागतील, असे सांगितले. कुटुंबीयांशी चर्चा करून निकी हा ८० हजार घेऊन सागरच्या घरी गेला. प्रीतीने निकी याला चर्चगेट येथे बोलावून त्याची एका व्यक्तीशी भेट घालून दिली. काम झाल्याचे सांगून त्याने उर्वरित ४० हजार घेतले. त्यानंतर नोकरी लावण्यास टाळाटाळ चालवली. 

काही दिवसांनी मंत्रालयात लिपिक म्हणून काम झाल्याचे सांगून सात लाखांचा खर्च सांगितला. त्यातले तीन लाख आता व चार लाख नंतर देण्यास सांगितले. भोईर कुटुंबीयांनीही कासारे दाम्पत्यावर विश्वास ठेवला. काही दिवसांत मंत्रालयात लिपिक पदावर नियुक्तीचे पत्र निकीचा भाऊ दीपेशच्या मोबाइलवर पाठवले. ५ नोव्हेंबर २०१९ रोजी कामावर हजर होण्यास त्यात नमूद केले होते. त्यामुळे भोईर कुटुंबाने कासारे दाम्पत्यास आणखी तीन लाख दिले. मंत्रालयात काेणाला भेटायचे असे विचारले असताना या दाम्पत्याने साहेब कामासाठी बाहेर गेल्याचे सांगितले. निकी याला शंका आल्याने त्याने मंत्रालयात कामाला असलेल्या मामा दुर्गेश म्हात्रे यांना नियुक्तीपत्र दाखवले असता ते बनावट असल्याचे सांगितले.

दाम्पत्य फरार
निकी आणि त्याचे कुटुंबीय कासारेच्या घरी गेले असता प्रीती व सागर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पैसे परत करतो असे सांगितले. त्यानंतर त्यांनी दिलेला चार लाखांचा धनादेशही वटला नाही. कासारे दाम्पत्य मोबाइल बंद करून पळून गेले असल्याने बुधवारी निकीच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: family looted for 4 20 lakh for job in mantralaya fake appointment letter was also given police investigating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.