कुटुंब गेले महाबळेश्वरला, अन् चोर आले घरी; पावणेतीन लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:38 AM2020-12-02T01:38:47+5:302020-12-02T01:39:04+5:30
गुन्हा दाखल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनी भेट देऊन पाहणी केली असून पोलीस उपनिरीक्षक एच. एम. वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत.
ठाणे : कोपरी येथील सचिन चौबळ (४३) यांना महाबळेश्वर येथे जाणे चांगलेच महागात पडले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी रोख रकमेसह दोन लाख ७० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी त्यांनी २९ नोव्हेंबर रोजी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कोपरीतील टिळकनगर येथील विक्रम को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहणारे चौबळ हे २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ ते २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत गावी महाबळेश्वर येथे कुटुंबीयांसह गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून एक लाख ६५ हजारांची रोकड, तीन तोळे वजनाचे ४० हजारांचे मंगळसूत्र, ३५ हजारांच्या बांगड्या असा सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. त्याच सुमारास चौबळ यांच्या घराशेजारील नीलेश राजाध्यक्ष यांच्या घराच्या दरवाजाचाही कडीकोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनी भेट देऊन पाहणी केली असून पोलीस उपनिरीक्षक एच. एम. वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत.