कर्ज देण्याच्या नावाखाली ८०० शेतकऱ्यांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:50 AM2019-10-03T05:50:25+5:302019-10-03T06:36:53+5:30

अहमदनगरच्या शेवगांवमध्ये २ जुलै रोजी कंपनीने कार्यालय थाटले. कंपनीचे भाडे म्हणून २५ हजार रुपयेही येथे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या श्रीहरी वायकरला त्यांनी दिले.

Farmer fraud case in the name of lending to agriculture, so far 57 complaints | कर्ज देण्याच्या नावाखाली ८०० शेतकऱ्यांची फसवणूक

कर्ज देण्याच्या नावाखाली ८०० शेतकऱ्यांची फसवणूक

Next

मनीषा म्हात्रे -
मुंबई : पडिक जमिनींसह शेतीवर कमी व्याजाने ६ ते २५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळवून देणाºया एका लोभस योजनेला फसून राज्यातील ८०० हून अधिक शेतकऱ्यांनी त्यात गुंतवणूक केली. मात्र ही योजना घेऊन आलेले ठग निघाल्याने शेतकरी कुटूंब हवालदिल झाले आहेत. फसल्या गेलेल्या बीडच्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने याबाबत मुंबई पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी मुंबईतील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या गेवराई येथील मालेगावचा रहिवासी नवनाथ श्रीहरी वायकर (२३) याच्या तक्रारीवरून पोलीस या रॅकेटचा शोध घेत आहेत. त्याचे आईवडील शेतकरी आहेत. घराच्या हलाकीच्या परिस्थितीतही नवनाथ बी.एस.सीच्या द्वित्तीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. घरच्यांना हातभार लावण्यासाठी तो नोकरीच्या शोधात असताना, ३० जानेवारीला एका दैनिकात त्याने, ‘लाईफ इन्फो केअर कंपनीच्या अ‍ॅग्रीकल्चरल लोन, होम लोन, बिझनेस लोन व प्रोजेक्टर लोन इत्यादी लोनसाठी तालुका स्तरावर सेल्स रिप्रझेन्टेटीव्ह नेमणे आहे’ अशी जाहिरात पाहिली. ती पाहून तो कामावर रुजू झाला होता. 

 शेतीवर कर्ज देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरण, आतापर्यंत ५७ जणांच्या तक्रारी
अहमदनगरच्या शेवगांवमध्ये २ जुलै रोजी कंपनीने कार्यालय थाटले. कंपनीचे भाडे म्हणून २५ हजार रुपयेही येथे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या श्रीहरी वायकरला त्यांनी दिले. २६ जुलै रोजी ४० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानुसार शेतकरी गोळा झाले. मात्र कर्मचारी आलेच नाहीत. त्यानंतर मुंबईतील कार्यालय, मोबाईल बंद करुन पसार झाले. मुंबईतील दाखल गुन्ह्यात नगरसह बीड येथील ५७ जणांच्या तक्रारी आतापर्यंत दाखल आहेत. यात प्रत्येकी २१ ते ४० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
वायकरसारख्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा वापर करत अशाप्रकारे राज्यभरातील ८०० हून अधिक शेतकºयांना गंडविले आहे. त्यापैकी काही जण तक्रारीसाठी पुढे येत आहे. तर, काही जण अजूनही पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हा आकडा आणखी मोठा असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

पैसेही गेले आणि कागदपत्रेही...

कर्जासाठी शेतकºयांच्या जमिनीचा ७/१२, ८ अ, आधारकार्ड, पॅनकार्ड व वैयक्तिक बचत खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचा ३ हजार ९७० रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. यात पैसे तर नाही पण त्यांची कागदपत्रेही ठगांकडे आहेत. त्यामुळे कागदपत्रांचा दुरुपयोग होण्याची भीती त्यांना सतावत आहे.

अद्याप अटक नाही...
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. संबंधित कर्मचारी, अधिकाºयांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती एमएचबी पोलीस ठाण्याचे गुन्हे अधिकारी धनंजय लिगाडे यांनी दिली.

अशी झाली नवनाथची फसवणूक
बीडच्या गेवराई येथील मालेगावचा रहिवासी असलेल्या नवनाथ श्रीहरी वायकर (२३) या तरुणाने कंपनीने शेतीवर कर्ज देण्याच्या नावाखाली राज्यातील ८०० शेतकºयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. प्रत्यक्षात चांगली नोकरी मिळेल म्हणून त्याने एका दैनिकात जाहिरात पाहून सदर कंपनीशी संपर्क साधला होता. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवनाथने पोलिसांत धाव घेतली.

आता फक्त मुंबई पोलिसांवरच विश्वास
आईवडिलांना मदत व्हावी, शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून पुढाकार घेतला. आधी बेरोजगारीने त्रस्त होतो त्यात, आता यात शेतकºयांच्या झालेल्या फसवणुकीमुळे धक्काच बसला आहे. याबाबत मीच पुढाकार घेत तक्रार केली. आता फक्त मुंबई पोलिसांवरच विश्वास आहे. ते लवकरात लवकर आरोपींना पकडून आमचे पैसे मिळवून देतील ही अपेक्षा आहे. माझ्यासारखे आठशे शेतकरी यात फसल्याचे नवनाथ वायकरने सांगितले.

Web Title: Farmer fraud case in the name of lending to agriculture, so far 57 complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.