आत्महत्येची चिठ्ठी लिहून शेतकरी बेपत्ता, बच्चू कडूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पत्नीची पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 08:30 PM2021-01-12T20:30:46+5:302021-01-12T20:32:18+5:30

Amravati Farmer News : चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील विजय सुखदेव सुने (४०) नामक शेतकरी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाले आहेत.

Farmer goes missing after writing suicide note, wife lodges complaint with police to file case against Bachchu Kadu | आत्महत्येची चिठ्ठी लिहून शेतकरी बेपत्ता, बच्चू कडूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पत्नीची पोलिसांत तक्रार

आत्महत्येची चिठ्ठी लिहून शेतकरी बेपत्ता, बच्चू कडूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पत्नीची पोलिसांत तक्रार

googlenewsNext

अमरावती - चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील विजय सुखदेव सुने (४०) नामक शेतकरी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाले आहेत. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी व त्यांचा मोबाईल घरीच सापडल्याने देऊरवाडा व शिरजगाव कसबा येथील त्याच्या नातेवाइकांत खळबळ उडाली आहे.

पतीने आत्महत्या केल्यास, शिरजगावचे ठाणेदार सचिन परदेशी व बीट जमादार राजू तायडे, तहसीलदार धीरज स्थूल, राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांचा खासगी सचिव दीपक भोंगाडे यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार बेपत्ता शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुने यांनी शिरजगाव पोलिसांत मंगळवारी नोंदविली.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अब्दागिरे शिरजगाव पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. शिरजगाव पोलिसांनी ‘मिसिंग’ची नोंद घेतली आहे. विजय यांना शोधण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनेची मोठी चर्चा परिसरात आहे. पोलीस ठाण्याच्या अवारात जत्रेचे स्वरूप आले असून, तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, यासंबंधाने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


अशी आहे तक्रार
पत्नी वैशाली सुने यांच्या तक्रारीनुसार, कुुटुंबीय झोपी गेल्यावर आत्महत्येबाबत चिठ्ठी लिहून ११ जानेवारी रोजी विजय सुने हे घरून निघून गेले. १२ जानेवारी रोजी सकाळी कुटुंबीय झोपेतून उठल्यावर ते घरी दिसले नाहीत. विजय सुने (देऊरवाडा) यांच्या नावाने शिरजगाव कसबा मार्गावर ८० आर शेत आहे. या शेतातून कोणाचाही रस्ता नसताना ठाणेदार परदेशी व बीट जमादार तायडे हे त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसून ठेवून शेतातून पलीकडच्या शेतात जाण्यासाठी रस्ता लिहून मागत होते. विजय सुने रस्ता लिहून देण्यास तयार नसल्याने बीट जमादार तायडे हे देऊरवाडा येथे घरी येऊन दोन-दोन तास बसत होते. रस्ता लिहून देण्यासाठी दमदाटी करीत होते.

शेतकऱ्याच्या चिठ्ठीत काय?
पत्नीच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत विजय सुने म्हणतात, तहसीलदारांचा आदेश आपल्या शेतातील केळी पिकाचे नुकसान करणारा आहे. त्या आदेशाने मानसिकता खराब झाली आहे. गेल्या ५-६ दिवसांपासून पोलिसांनी मला फोन करून धमकावले. मी पूर्णपणे हरलेलो आहे. म्हणून मी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने घर सोडून जात आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला नेहमीच खंबीर साथ दिली. माझ्या पश्चात आईवडिलांची काळजी घेशील, अशी खात्री आहे, असा मायना विजय सुने यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.

ठाणेदार म्हणतात, तहसीलदारांचा आदेश
पोलिसांचा या प्रकरणाशी तीळमात्र संबंध नाही. विजय सुने यांच्या शेतामागे नंदलाल भोंगाडे यांचे शेत आहे. त्यांना रस्ता नाही. शेतातील संत्री परिपक्व झाली आहेत. ती काढण्यासाठी भोंगाडे यांनी रस्त्याची मागणी केली. सुने यांचा त्याला विरोध होता. तहसीलदारांनी संत्री काढण्यापुरता बंदोबस्त देण्याचा आदेश जारी केला. त्यासाठी नियमानुसार भोंगाडे यांच्याकडून २३००० रुपये भरून घेतले. बुधवारी बंदोबस्त पुरविणार होतो. तत्पूर्वी ही घटना घडली. या प्रक्रियेत पोलिसांचा दोष नाही, अशी माहिती शिरजगाव कसबाचे ठाणेदार सचिन परदेशी यांनी दिली.
 

Web Title: Farmer goes missing after writing suicide note, wife lodges complaint with police to file case against Bachchu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.