बळीराजा काय रे हे! बाप्पाच्या विसर्जनानंतर त्याच शेततळ्यात उडी घेत शेतकऱ्याने घेतला जगाचा निरोप
By चैतन्य जोशी | Published: September 10, 2022 04:08 PM2022-09-10T16:08:50+5:302022-09-10T16:10:13+5:30
अंबोडा येथील घटनेने खळबळ : देवळी पोलिसांनी घेतली नोंद
वर्धा : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरुन अनेक उपाययोजना सुरु आहेत. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अशीच एक घटना देवळी तालुक्यातील अंबोडा गावात शुक्रवारी ९ रोजी घडली आहे. कर्जबाजारी शेतकऱ्याने गणपती विसर्जनानंतर स्वत:ही जगाचा निरोप घेतला. या घटनेने अंबोडा गावात एकच खळबळ उडाली.
गुणवंता अजाब मडावी (६०) रा. अंबोडा असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. गुणवंताकडे दोन एकर शेत आहे. मात्र, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे तो नेहमी विवंचनेत राहत होता. कर्जाची रक्कम फेडावी तरी कशी हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे उभा होता. शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे गुणवंता त्रस्त होता. शुक्रवारी लहान भाऊ रमेश मडावी याच्याकडील गणपती विसर्जन असल्याने सर्व कुटुंबीय सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका शेतातील शेततळ्यावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. लगतच गुणवंताचे शेत असल्याने तो शेतात होता. बाप्पाला निरोप देऊन सर्व कुटुंबिय घरी परतले. मात्र, गुणवंताने बाप्पाच्या विसर्जनानंतर त्याच शेततळ्यात उडी घेत जगाचा निरोप घेतला.
शनिवारी १० रोजी सकाळच्या सुमारास गुणवंताचा मृतदेह तळ्याबाहेर काढण्यात आला. देवळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी घटनास्थळी जात पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला.
चार दिवसांपूर्वी दिली होती नोटीस
मृतक गुणवंता याच्यावर गिरोली येथील स्टेट बॅंकेचे कृषी कर्ज होते. चार दिवसांपूर्वीच बॅंकेतील कर्मचारी गुणवंताच्या घरी आले होते. त्यांनी नोटीसही बजावली होती. तेव्हापासूनच गुणवंता विवंचनेत होता. त्याच विवंचनेतून त्याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले.
आकस्मिक मृत्यूची नोंद
गुणवंता मडावी याच्यावर कृषी कर्ज होते. याच विवंचनेतून त्याने आत्महत्या केली. ९ रोजी दुपारपासून मृतदेह तळ्याबाहेर काढण्याचे काम सुरु होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील रेस्क्यू पथकही बोलाविण्यात आले होते. अखेर १० रोजी सकाळी गुणवंताचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.