Farmers Protest : सिंघू बॉर्डरवर आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू; झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 04:23 PM2021-11-10T16:23:48+5:302021-11-10T16:30:43+5:30
Farmers Protest : गुरप्रीत सिंह असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो पंजाबच्या फतेहगढ साहिबच्या अमरोहमधील एका गावचा रहिवासी होता.
नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये अनेकदा चर्चा झाली असली तरी अद्याप याबाबत काहीही तोडगा निघालेला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. याच दरम्यान बुधवारी सिंघू सीमेवर आंदोलनात सहभागी झालेल्या आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या की आत्महत्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरप्रीत सिंह असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो पंजाबच्या फतेहगढ साहिबच्या अमरोहमधील रुरकी गावचा रहिवासी होता. गुरप्रीत सिंह बीकेयू सिद्धपूरशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. कुंडली पोलीस ठाणे सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. गुरप्रीत सिंगच्या पश्चात त्याची पत्नी आणि एक 20 वर्षांचा मुलगा आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.
हातावर लिहिलं होतं 'जिम्मेदार'
बीकेयू एकता सिद्धुपूरच्या गुरजिंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सहाच्या सुमारास त्यांना घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी गुरप्रीत सिंहला रुग्णालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. "सोमवारी गुरप्रीत सिंह आपल्या गावावरून सिंघू सीमेवर परतला होता. गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादात गुरप्रीत सिंहने कृषी कायद्यांवरील अडथळ्यामुळे नाराज असल्याचा उल्लेख केला आणि एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी आंदोलने करूनही सरकार त्यांच्या मागण्या ऐकून घेत नाही" असं म्हटलं होतं. गुरप्रीतने मृत्यूपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही. त्याच्या डाव्या हातावर फक्त 'जिम्मेदार' हा शब्द लिहिलेला आहे असे गुरजिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"महापंचायत शेतकरी विरोधी सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल"
शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमधून त्यांनी शेतकऱ्यांना संदेश व केंद्र सरकारला सूचक इशारा दिला आहे. "संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने 22 नोव्हेंबर लखनऊमध्ये किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही महापंचायत ऐतिहासिक असेल आणि शेतकरी विरोधी सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल. महापंचायतीनंतर आता पूर्वांचलमध्ये देखील शेतकरी आंदोलन आणखी गतीमान होईल" असं ट्विटमध्ये टिकैत यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी 22NovemberLucknowKisanMahapanchayat हा हॅशटॅग देखील वापरला आहे.