चौघुले प्लॉट भागात दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला, जळगावातील प्रकार
By विजय.सैतवाल | Published: July 17, 2023 12:15 AM2023-07-17T00:15:25+5:302023-07-17T00:15:55+5:30
रात्री ११ वाजेची घटना, सुटका करीत दुचाकीस्वार पळाला
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: दुचाकीवर जात असलेल्या एका तरुणाला अडवून त्याला बेदम मारहाण करीत डोक्यात फरशा टाकून जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास चौघुले प्लॉट भागात घडली. या हल्ल्यातून कसातरी बचाव करीत तरुण धावत सुटला. शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाल्याने हल्लेखोरदेखील फरार झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
मुमराबाद रस्त्यावर चौघुले प्लॉट कॉर्नर नजीक एक दुचाकीस्वार जात असताना त्याला दोन जणांनी अडविले. तो थांबताच त्याच्यावर दहा ते बारा जणांनी हल्ला करीत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तो परिसरात इकडे तिकडे पळू लागला. त्यावेळी एका ठिकाणी त्याला पकडून त्याच्या डोक्यात फरशा टाकल्या. यातून कशीतरी सुटका करीत हा तरुण पळून गेला. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.
तरुणाच्या दुचाकीची तोडफोड
हा तरुण ज्या दुचाकीवरून जात होता त्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. याशिवाय दुचाकीस्वारावर हल्ला करताना या परिसरात असलेल्या सागर चौधरी यांच्या चारचाकी वाहनाचेदेखील नुकसान झाले. हल्ला करीत असताना समोर सीसीटीव्ही असल्याचे लक्षात येतात हल्लेखोराने चेहऱ्यावर रुमाल बांधला व तेथून निघून गेले.
भर वस्तीत दहशत
चौघुले भाग परिसरातील भरवस्तीत हल्लेखोरांनी दहशत पसरविली. आजूबाजूला अनेक जण असतानादेखील हल्लेखोरांनी दुचाकीस्वाराला घेरले व त्याच्यावर हल्ला केला. गेल्या वर्षी देखील याच ठिकाणी एका जणाचा खून झाला होता. या परिसरात दहशत दिवसेंदिवस वाढत असून मद्य विक्रीदेखील खुलेआम सुरू असल्याचे रहिवाशांनी सांगितले. येथील गुंडगिरीला आळा बसावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली.