कोपर खैरणेत एकावर जीवघेणा हल्ला; आपसातील वादातून घडला प्रकार
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 12, 2022 09:51 PM2022-09-12T21:51:04+5:302022-09-12T21:53:46+5:30
आपसातील वादातून एकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना कोपर खैरणे सेक्टर २ येथे सोमवारी रात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : आपसातील वादातून एकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना कोपर खैरणे सेक्टर २ येथे सोमवारी रात्री घडली. यामध्ये एकजण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून हल्ला करणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत आहेत.
कोपर खैरणे सेक्टर ३ येथील चिकनेश्वर मंदिरासमोरील उद्यानात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. यामध्ये राजेश जेजुरकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार आपसातील वादातून झाला असल्याचे समोर येत आहे. मात्र हल्ला करणाऱ्यांची माहिती अद्याप उघड झालेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. घटना घडलेल्या ठिकाणी दिवस रात्र व्यसनी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांच्या टोळ्या जमलेल्या असतात. त्यात जेजुरकर याचा देखील समावेश असायचा. तर त्यांच्यात यापूर्वी देखील अनेकदा छोट्या मोठ्या वादाच्या घटना घडलेल्या आहेत.
जेजुरकर याच्यावर हल्ला करणारे त्याच परिसरातील व १७ ते २२ वयोगटातले असल्याचे समोर येत आहे. जेजुरकर याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सर्वजण एकाच गटातले आहेत. रविवारी रात्री त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता असे समजते. या वादातून त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी संध्याकाळी जेजुरकर हा सेक्टर ३ येथील उद्यानात झोपला असताना ७ ते १० जणांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून तिथून पळ काढला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या अनुशंघाने कोपर खैरणे पोलिसांनी विविध पथके तयार केली असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे कोपर खैरणे परिसरात व्यसनी मुलांच्या टोळ्यांची दहशत वाढत असल्याचे दिसून येत आहे.