हॉर्न वाजविला म्हणून शेतकरी कुटुंबातील तरुणांवर जीवघेणा हल्ला; दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल
By शेखर पानसरे | Published: May 30, 2023 01:45 PM2023-05-30T13:45:05+5:302023-05-30T13:45:22+5:30
पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : गाडीचा हॉर्न वाजवला. या किरकोळ कारणावरून तालुक्यातील जोर्वे येथील शेतकरी कुटुंबांतील तरुणांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार रविवारी (दि.२८) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील जोर्वे नाका परिसरात घडला होता. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने रात्री ९.३० च्या सुमारास जोर्वे येथील तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.२९) दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. यातील १४ जणांना अटक केल्याचे श्रीरामपूर उपविभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी सांगितले.
रविवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास जोर्वे गावातील शेतकरी कुटुंबांतील सुमीत पोपट थोरात, तन्मय नानासाहेब दिघे, विजय मंजाबापू थोरात आणि एक अल्पवयीन मुलगा हे पशुखाद्याचे विक्री करून पिकअप या चारचाकी वाहनातून जोर्वे येथे जात होते. जोर्वे नाका येथे आल्यानंतर गाडीचा हॉर्न वाजवला. या किरकोळ कारणावरून त्यांना जोर्वे नाका येथील बाबू टपरी वाला, इम्रान वडेवाला, नदीम हुसेन शेख, इम्रान (युसूफ पेंटरचा मुलगा), रियाज जहीर शेख, रिक्षावाला राहीफ व सफीक चहावाला यांनी व इतर २५ ते ३० जणांनी मारहाण केली.
त्याबाबत रविंद्र नामदेव गाडेकर, गोकूळ गणपत दिघे, बाबासाहेब शिवाजी थोरात, जितेंद्र कैलास दिघे, अजय भीमाजी थोरात, गणेश बंडोपंत काकड हे संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास रविंद्र गाडेकर, गोकूळ दिघे, बाबासाहेब थोरात, जितेंद्र दिघे, अजय थोरात (सर्व रा. जोर्व, ता. संगमनेर) हे तीन दुचाकीवरून जोर्वे येथे जात असताना शंभर ते दीडशे जणांचा जमाव त्यांच्याकडे धावत आला. त्यांच्या हातात तलावर, चॉपर, फायटर, लाकडी दांडे, लोखंडी रॉड होते. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला.
जमावातील इरफान व इम्रान वडेवाला व त्यांच्याकडे काम करणारे तिघे, बाबू टपरीवाला, अकिल टपरीवाला, नदीम हुसेन, ताहीर नजीर पठाण, शाहिद वाळूवाला, मुसेफ शेख, मुज्जू, फय्यूम फिटर, राहिफ चहावाला, साफीक चहावाला, एफफू खान वाडेवाला यांनी त्यांना मारण्यास करण्यास सुरूवात केली. बेदम मारहाण करत गंभीर जखमी करण्यात आले होते. मारहाण झालेले सर्वजण पुन्हा पोलिस ठाण्यात गेले. जखमीवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून १४ जणांना ताब्यात घेतले. अजूनही कारवाई सुरू आहे.