"पप्पा, पोलिसात तक्रार करू नका, हे लोक मला मारून टाकतील"; लेकीने मृत्यूआधी सांगितलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 11:42 AM2023-08-09T11:42:09+5:302023-08-09T11:42:33+5:30
एका गर्भवती महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्या सासरच्या लोकांवर करण्यात आला आहे. वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूचे दुःख व्यक्त केलं आहे.
उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका गर्भवती महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्या सासरच्या लोकांवर करण्यात आला आहे. वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूचे दुःख व्यक्त केलं आहे. याप्रकरणी त्यांनी एसपीकडे तक्रार केली असून आरोपी सासरच्या मंडळींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाची दखल घेत एसपींनी स्टेशन प्रभारींना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
हे प्रकरण नरैनी कोतवालीच्या मोतियारी गावाशी संबंधित आहे. मुलीचे वडील विनोद तिवारी यांनी सांगितले की, 2017 मध्ये त्यांनी मोतियारी गावात त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. त्यांनी सांगितलं की, लग्नानंतर सासरचे लोक दोन लाख रुपये आणि बाईकची डिमांड करत होते. मुलगीही गरोदर होती.
सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप करत वडिलांनी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने माझ्या मुलीची हत्या केल्याचं सांगितलं. जेव्हा सासरचे लोक मुलीला त्रास देत असत तेव्हा ती आम्हाला फोनवर सर्व काही सांगायची. पप्पा तुम्ही पोलिसात तक्रार करू नका, नाहीतर हे लोक मला मारून टाकतील असं देखील मुलीने म्हटलं होतं.
"हुंडा न मिळाल्याने सासरच्यांनी मुलीची हत्या केली"
वडिलांनी पुढे सांगितले की, मला पाच मुली आहेत. मी शेती करून उदरनिर्वाह करतो. थोडे थोडे पैसे त्यातून जमा करून जोडून मुलीचं लग्न लावून दिलं होतं. पण, हुंडा न मिळाल्याने सासरच्यांनी मुलीची हत्या केली. मुलीच्या मोठ्या बहिणीने सासरच्या लोकांवर हुंड्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.
"चौकशीनंतर कारवाई केली जाईल"
या प्रकरणी डीएसपी जियाउद्दीन अहमद यांनी सांगितले की, नरैनी पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी मारहाण केली, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासात जे काही सत्य समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.