बलात्कारप्रकरणी वडिलांना जामीन मंजूर; आरोप खोटा असल्याची शक्यता : हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:14 AM2024-10-18T11:14:47+5:302024-10-18T11:15:17+5:30
दोघांमध्ये वैवाहिक वाद असल्याने वडिलांवर खोटा आरोप केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठाने वडिलांची जामिनावर सुटका केली.
मुंबई : पालकांच्या वादात मुलीने आईच्या सांगण्यावरून वडिलांवर लैंगिक अत्याचाराचा खोटा आरोप केला असण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने संबंधित व्यक्तीची जामिनावर सुटका केली. दोघांमध्ये वैवाहिक वाद असल्याने वडिलांवर खोटा आरोप केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठाने वडिलांची जामिनावर सुटका केली.
पीडितेची आई व अर्जदार यांच्यातील गंभीर वादाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या प्रकरणात (मुलीवर लैंगिक अत्याचार) अर्जदाराला नाहक अडकविण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्जदाराने आधीच एक वर्ष कारावास भोगला आहे. त्याच्यावर आरोप निश्चितीही करण्यात आलेली नाही. ४ डिसेंबर २०२३ रोजी त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याची अर्जदाराची याचिका आम्ही मंजूर करत आहे, असेही न्या.पितळे यांनी म्हटले.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, पीडितेचे पालक वेगळे राहतात. ऑक्टोबर २०२३ मध्ये मुलगी वडिलांकडे राहायला गेली.१३ ऑक्टोबर रोजी ती तिच्या बहिणीला शाळेत सोडून घरी आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याबाबत तिने २५ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यांनी लगेचच आरोपीला अटक केली.
पीडितेने ११ दिवसांनंतर पोलिसांकडे तक्रार केली. तेही आई भेटल्यानंतर तिने गुन्हा दाखल केला. सुरुवातीला तिने वडिलांनी १३ ऑक्टोबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. तर तिच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये तिने कोरोनापासून वडील आपल्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने वडिलांचे घर सोडले आणि आईकडे राहायला गेली.
पुन्हा तेथेच का गेली ?
वडिलांनी अत्याचार केला तरी मुलगी पुन्हा वडिलांकडे राहायला का गेली? अशी शंका न्यायालयाने उपस्थित केली. मुलीमध्ये आणि आईमध्ये मतभेद झाल्यानंतर मुलगी वडिलांकडे राहायला गेली, मुलीवर वडिलांनीच लैंगिक अत्याचार केला असता तर आईने पुन्हा मुलीला वडिलांकडे राहायला का पाठवले असते? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले.