Crime News: जावयाकडून सासऱ्याचा विश्वासघात! ९७ लाखांना लुबाडले, दिव्यांग पत्नीलाही सोडून गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 08:34 AM2022-03-08T08:34:57+5:302022-03-08T08:35:07+5:30
मीरा राेडमधील कुटुंबाची फसगत. लग्नानंतर ताे महिन्यातील आठ दिवस मीरा रोडला सासरी राहायला असे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : एका इंग्रजी वृत्तपत्रातील जाहिरात पाहून मुलीचे लग्न परराज्यातील व्यक्तीशी करणे मीरा रोडच्या शांतीनगरमधील एका मराठी कुटुंबाला वेदनादायी ठरले आहे. जावयाने ९७ लाखांना गंडा घालून दिव्यांग पत्नीला एकटेच सोडून पळ काढला आहे. नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अजय अग्रवाल नावाने विवाहासंबंधी जाहिरात आली हाेती. त्यात त्याने त्याचा अग्रवाल कन्स्ट्रक्शन नावाने व्यवसाय असून, कार्यालय नवी दिल्ली येथे, तर कोलकाता येथील घराचा पत्ता दिला होता. स्थळ चांगले वाटल्याने या कुटुंबाने अजयशी संपर्क केला. त्यानंतर ताे मीरा रोडला त्यांच्या घरी आला. मार्च २०१९ मध्ये घरीच लग्न केले. त्यानंतर अजयने त्याचे वडील मरण पावल्याचे व आईसोबत पटत नसल्याचे कारण सांगितले.
२१ फेब्रुवारीला बोरीवली रेल्वे स्थानकावरून अजय हा भावाच्या साखरपुड्याला पत्नीला घेऊन दिल्लीला गेला. त्यासाठी पत्नीच्या अंगावर दागिने हवेत म्हणून सासरच्यांकडून दागिने घेतले. सासूला फोन करून तुमच्या मुलीला चालता येत नसल्याने साखरपुड्याला जायचे रद्द केल्याचे सांगून मुंबईला परतत असल्याचे कळवले. त्यानंतर त्याने दिल्लीहून तिला ट्रेनमध्ये बसवले. सासूने अजयला तो न आल्याचे कारण विचारले. त्याने २६ फेब्रुवारीला येणार सांगून ताे परत आलाच नाही.
अशी केली फसवणूक
लग्नानंतर ताे महिन्यातील आठ दिवस मीरा रोडला सासरी राहायला असे. त्याने सासरच्या नावाने लखनऊ येथे पाच खोल्यांचा मोठा फ्लॅट घेऊ सांगितल्याने कुटुंबाने त्यांचा फ्लॅट विकून पैसे बँकेत ठेवले होते. फ्लॅट घेण्यासाठी त्याला धनादेश दिले असता, धनादेश चालत नसल्याचे सांगून रोख रक्कम देण्याची मागणी केली. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ८२ लाख रुपये बँकेतून काढून दिले. तसेच दिल्ली येथे त्याच्या भावाच्या साखरपुड्याला जायचे म्हणून पत्नीच्या अंगावर दागिने हवेत म्हणून सासरच्यांकडील हिऱ्यांची कर्णफुले, हातातील हिऱ्याच्या दोन अंगठ्या, एक सोन्याचे मंगळसूत्र, दोन पाटल्या आणि पत्नीकडील ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने स्वत:कडे ठेवून घेतले.