सुनेची गोळ्या झाडून हत्या करणारा सासरा अखेर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 09:30 PM2022-04-16T21:30:28+5:302022-04-16T21:31:08+5:30
सकाळी नाश्ता दिला नाही या रागातून सासऱ्याने सुनेवर गोळी झाडल्याची घटना गुरुवारी ठाण्याच्या राबोडीत समोर आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सकाळी नाश्ता दिला नाही या रागातून सासऱ्याने सुनेवर गोळी झाडल्याची घटना गुरुवारी ठाण्याच्या राबोडीत समोर आली होती. या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या सीमा पाटील (४२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर मारेकरी सासरा काशिनाथ पाटील (७४) हे घटनेनंतर पळून गेले होते. फरार सासऱ्याच्या माघारवर २ पोलीस पथक होती. मात्र शनिवारी संध्याकाळी आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
बांधकाम व्यावसायिक असलेले मारेकरी काशिनाथ पाटील यांना दोन मुले आहेत. हे कुटुंब एकत्र राहत असून काशिनाथ यांचे त्यांच्या पत्नीसह दोन्ही सुनांबरोबर वारंवार खटके उडत होते. त्यातच ते नातेवाईकांकडे सुनांची बदनामी करत, त्यातच गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काशिनाथ पाटील यांना नाश्ता मिळाला नाही. याच रागातून त्यांनी बंदूक काढून मोठा मुलगा राजेंद्र यांची पत्नी सीमा यांच्या पोटात गोळी झाडली. जखमी झालेल्या सीमा यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.तेथे शस्त्रक्रिया ही करण्यात आली. मात्र गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून फरार झालेल्या काशिनाथ पाटील यांचा शोध सूरु होता.
दोन दिवस फरार आरोपीचा शोध पोलिस घेत होते. मात्र शनिवारी सायंकाळी आरोपी काशिनाथ हे स्वतः राबोडी पोलिस ठाण्यात हजर झाले, आणि ते पोलिसांना स्वाधीन झाले. पोलिसांनी काशिनाथ यांना अटक केली आहे. आपल्याकडून चुकीची घटना घडल्याचा त्यांना आता पश्चाताप झाला आहे. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या करण्याचा विचारही केला होता, अशी माहिती राबोडी पोलिसांनी दिली. मात्र शनिवारी ते स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती राबोडी, पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.