नाश्ता न दिल्याने सासऱ्याने सुनेवरच केला गोळीबार; सुनेचा मृत्यू, सासरा फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 01:04 PM2022-04-16T13:04:15+5:302022-04-16T13:04:40+5:30

सकाळी नाश्ता दिला नाही, या रागातून सासऱ्याने मोठ्या सुनेवर गोळी झाडून तिचा खून केल्याची घटना ठाण्यातील राबोडी परिसरात गुरुवारी घडली.

Father in law fired at daughter in law for not giving breakfast | नाश्ता न दिल्याने सासऱ्याने सुनेवरच केला गोळीबार; सुनेचा मृत्यू, सासरा फरार

नाश्ता न दिल्याने सासऱ्याने सुनेवरच केला गोळीबार; सुनेचा मृत्यू, सासरा फरार

googlenewsNext

ठाणे :

सकाळी नाश्ता दिला नाही, या रागातून सासऱ्याने मोठ्या सुनेवर गोळी झाडून तिचा खून केल्याची घटना ठाण्यातील राबोडी परिसरात गुरुवारी घडली. या गोळीबारात सीमा पाटील (४२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सासरे काशिनाथ पाटील (७४) हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपीकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होते. ती जप्त केल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली. पाटील हे आधी बांधकाम व्यावसायिक होते. त्यांना दोन मुले असून, ते दोघेही याच व्यवसायात आहेत. त्यांचे कुटुंब ऋतू पार्कजवळ असलेल्या विहंग अपार्टमेंटमध्ये एकत्र वास्तव्यास आहे.

काशिनाथ यांचे त्यांच्या पत्नीसह दोन्ही सुनांबरोबर वारंवार खटके उडत होते. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची मोठी सून सीमा यांनी पाटील यांना डायनिंग टेबलवर चहा नेऊन दिला; मात्र नाश्ता दिला नाही, म्हणून त्यांना राग आला. याच रागातून त्यांनी रिव्हॉल्व्हर काढून सून सीमा यांच्या पोटात गोळी झाडली. हा प्रकार लहान मुलगा सुजय यांची पत्नी श्वेता यांच्यासमोर घडला. जखमी झालेल्या सीमा यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नंतर ठाण्यातीलच दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये हलवून सीमा यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली; मात्र गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हॉस्पिटलमधून हा प्रकार राबोडी पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली.

याप्रकरणी श्वेता सुजय पाटील यांच्या तक्रारीवरुन काशिनाथ पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर रिव्हॉल्व्हर घरातील कपाटात ठेवून काशिनाथ पळून गेले. ते कळव्यात एका ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तिथे पथकही रवाना झाले होते; मात्र कळव्यात ते मिळाले नाही. त्यांचा मोबाइल बंद असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.

Web Title: Father in law fired at daughter in law for not giving breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.