बापानं ११ वर्षीय पोराचा गळा चिरला, पत्नी आणि चिमुकल्याला सोडलं नाही, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 11:38 AM2021-11-03T11:38:37+5:302021-11-03T11:39:03+5:30
पोलिसांच्या माहितीनुसार, तंबोलिया गावातील नरेश मीणा वेल्डिंग दुकान चालवायचा. तो पत्नी लक्ष्मी, मुलगा विशाल, ६ वर्षीय मुलगी आणि दीड महिन्याचा मुलगा यांच्यासोबत राहत होता.
राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातील तंबोलिया गावात सोमवारी रात्री खळबळजनक घटना घडली. याठिकाणी एका निर्दयी पित्यानं ११ वर्षीय मुलाचा गळा कापून त्याची हत्या केली. इतकचं नाही तर शेजारीच झोपलेल्या पत्नी आणि दीड महिन्याच्या मुलावर चाकूने वार केले. वेदनेने तडफत असलेल्या भावाची आणि आईचा आवाज ऐकून ६ वर्षाची मुलगी झोपेतून जागी झाली. पित्याची नजर त्या मुलीवर पडली असता तिच्या दिशेने धावला. तितक्यात मुलगी पळाली अन् आजी-आजोबांकडे गेली. ज्यामुळे तिचा जीव वाचला
मुलं आणि पत्नीला मारल्यानंतर पित्याने विहिरीत उडी घेतली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी जखमी पत्नी, मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलला नेले. तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. विहिरीत उडी घेतलेल्या पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चौकशीत आरोपी पित्याने पोलिसांना जे सांगितलं त्याने धक्काच बसला. आरोपीने ४ दिवसांपासून कुटुंबाची हत्या करून सुसाईड करण्याचं प्लॅनिंग केले होते.
दीड महिन्याच्या मुलाच्या पोटात चाकूने भोसकले
पोलिसांच्या माहितीनुसार, तंबोलिया गावातील नरेश मीणा वेल्डिंग दुकान चालवायचा. तो पत्नी लक्ष्मी, मुलगा विशाल, ६ वर्षीय मुलगी आणि दीड महिन्याचा मुलगा यांच्यासोबत राहत होता. घरी नरेशचे आईवडीलही होते. घटनेच्या रात्री सर्व सदस्य जेवण करुन झोपले होते. तेव्हा नरेश मीणाच्या बाजूला विशाल झोपलेला होता. पत्नी, मुलगी आणि दीड महिन्याचा मुलगा दुसऱ्या पलंगावर होते. रात्री २ च्या सुमारास नरेशनं चाकूने झोपलेल्या अवस्थेत विशालचा गळा कापला. विशालचा आवाज ऐकून पत्नी आणि दोन्ही मुलं जागी झाली. त्यानंतर नरेशनं पत्नीच्या गळ्यावर आणि छातीवर चाकूने वार केले. तर दीड महिन्याच्या मुलाच्या पोटात चाकू भोसकला.
६ वर्षीय मुलगी वडिलांचा हा अवतार पाहून खूप भयभीत झाली. ती घराच्या बाहेर पळाली. क्रूर पिता मुलीच्या मागे धावला. तोवर मुलगी आजी-आजोबाच्या खोलीत शिरली. त्यानंतर आरोपी नरेशनं घराबाहेर जात विहिरीत उडी घेतली. मुलीनं वडिलांचे कृत्य आजीआजोबांना सांगताच ते हैराण झाले. स्थानिक लोकं जमा झाली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी पत्नी आणि मुलाला हॉस्पिटलला पाठवलं. विशालला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पत्नी आणि दीड महिन्याच्या मुलावर उपचार सुरू आहेत.
४ दिवसांपासून प्लॅनिंग
पोलिसांनी घटनास्थळी नरेशचा शोध घेतला. त्यानंतर २ तासांच्या अथक प्रयत्नाने विहीरीत एका मोटार पंपावर तो बसला होता. पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर चौकशी केली असता ४ दिवसांपासून कुटुंबाला मारुन आत्महत्या करण्याचा त्याचा डाव होता. कौटुंबिक वाद आणि आर्थिक तंगीमुळे नरेशनं हा टोकाचा निर्णय घेतला. मागील ३ दिवस तो अयशस्वी झाला परंतु सोमवारी त्याने दुर्दैवी कृत्य केले.