धक्कादायक! सुनेवर वार करून सासऱ्यानं घर पेटवलं, मग गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 03:29 PM2021-10-13T15:29:17+5:302021-10-13T15:32:15+5:30
बदलापुरात प्रॉपर्टीच्या वादातून धक्कादायक प्रकार, जखमी सुनेवर रुग्णालयात उपचार सुरू, तर सासऱ्याचा मृत्यू
बदलापूर : प्रॉपर्टीच्या वादातून सासऱ्याने आधी सुनेच्या डोक्यात वार केले, आणि मग घर पटवून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे. या घटनेने बदलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
बदलापूर पश्चिमेच्या शनि नगर परिसरातील हेरंब सृष्टी अपार्टमेंटमध्ये किसन जाधव हे मुलगा, सून, नात आणि नातू यांच्यासह वास्तव्याला आहेत. आज दुपारच्या सुमारास जाधव यांचा मुलगा कामावर गेला होता, तर मुलाची दोन्ही मुलं बाहेर गेली होती. यावेळी किसन जाधव आणि त्यांची सून असे दोघेच घरात असताना या दोघांमध्ये प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद झाले. या वादात जाधव यांनी सुनेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यानंतर सुनेने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि सुनेला रुग्णालयात नेले. मात्र यानाबतर किसन जाधव यांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून कपाट लावले आणि संपूर्ण घर पेटवून दिले. यानंतर स्वतः नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांच्या घरातून धूर निघू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.
बदलापुरात प्रॉपर्टीच्या वादातून धक्कादायक प्रकार, सुनेवर वार करून सासऱ्याची आत्महत्या #Badalapurpic.twitter.com/VVVnrGCVZ8
— Lokmat (@MiLOKMAT) October 13, 2021
अग्निशमन दलाने जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता संपूर्ण घर जळून खाक झाले होते, तर जाधव हे अर्धमेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने इमारतीखाली आणले असता इमारतीच्या दारातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जाधव यांच्या जखमी सुनेवर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हा प्रकार प्रॉपर्टीच्या वादातूनच घडल्याची माहिती जाधव कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. या घटनेमुळे बदलापूर शहरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.