जन्मदात्या बापाने रुमालाने आवळला पोटच्या पोरीचा गळा
By परिमल डोहणे | Published: October 4, 2022 08:34 PM2022-10-04T20:34:08+5:302022-10-04T20:34:45+5:30
चंद्रपूरातील शास्त्रीनगर येथील घटना : रामनगर पोलिसाने केली बापास अटक
चंद्रपूर : 10 वर्षीय दिव्यांग मुलीची हातरूमालीने गळा आवळून बापानेच हत्या केली. एवढ्यावरच न थांबता आपले बिंग फुटू नये म्हणून मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र डॉक्टरांना संशय येताच तिचे शवविच्छेदन करण्यात आले. आठवडाभरानंतर शवविच्छेदन अहवाल आला अन सारा प्रकार पुढे आला. चित्रपटात शोभावी अशी ही धक्कादायक घटना चंद्रपूरातील श्यामनगर येथे घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी बापास अटक केली आहे.
विजय नारायण बारापात्रे (46) रा श्यामनगर असे आरोपी बापाचे नाव आहे. तर मृणाली विजय बारापात्रे (10) असे मृत मुलीचे नाव आहे.
विजय बारापात्रे यांची 10 वर्षीय मृणाली नावाची मुलगी दिव्यांग होती. ती उठत बसत नसल्याने ती बेडवरच झोपून राहत होती. तिची प्राप्तविधी आई-वडिलांनाच करावी लागत होती.
२३ सप्टेंबरला मुलीची आई बाहेर गेली होती. दरम्यान त्या मुलीने बेडवरच शौच केली. हा प्रकार बघितल्यानंतर संतापलेल्या बापाने हातरूमालाने मुलींचा गळा आवळून निघृणपणे हत्या केली. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले, पोलिस हवालदार सुदाम राठोड, पोलिस शिपाई मंगेश सायंकार यांच्या पथकाने तपास करीत बापास अटक केली. पोलिसांनी मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहेत.
वडिलांनेच केले रुग्णालयात भरती
हत्या केल्यानंतर नेसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी वडिलांने पत्नीला फोन करून मुलीची प्रकृती खालावल्याचे सांगितले. दरम्यान पत्नी धावत घरी आली. तिच्या मदतीने स्वतःच मुलीला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या मुलीची तपासणी केल्यानंतर तिच्या गळ्यावर व मानेवर काही खुणा आढळून आल्या. त्यामुळे डॉक्टरांचा संशय बळावला. त्यांनी लगेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. सोमवारी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गळा आवळून हत्या केल्याचे पुढे आले. त्यामुळे रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले यांनी तपास करून वडिलाला ताब्यात घेतले. त्याला खाकी हिसका दाखवला असता त्याने हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी कलम 302, 202 अन्वये गुन्हा दाखल करून बापास अटक केली.