धक्कादायक! घरात त्रास देणाऱ्या मुलाचा वडिलांनीच सुपारी देऊन काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 12:17 PM2020-02-15T12:17:37+5:302020-02-15T12:19:38+5:30

बापाकडून गुन्ह्याची कबुली; सूत्रधार आणि मारेकऱ्यासह चौघांना अटक 

father planned murder of his son in solapur | धक्कादायक! घरात त्रास देणाऱ्या मुलाचा वडिलांनीच सुपारी देऊन काढला काटा

धक्कादायक! घरात त्रास देणाऱ्या मुलाचा वडिलांनीच सुपारी देऊन काढला काटा

Next

सोलापूर : नेहमी शिवीगाळ करणे, काहीही कामधंदा न करता जमीन नावावर करून देण्यासाठी वडिलांकडे तगादा लावणाऱ्या आणि घरातील सर्वांना अतोनात त्रास देणाऱ्या मुलाचा त्याच्या बापानेच सुपारी देऊन काटा काढला. हा प्रकार सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे़ या प्रकरणी वडील, खुनाचा सूत्रधार आणि दोन मारेकऱ्यांसह चौघांना वळसंग पोलिसांनी अटक केली आहे. 

मार्डी येथील शैलेश सुरेश घोडके (वय ३१, ता. उत्तर सोलापूर) हा बुधवार २९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास कुंभारी हद्दीत जमादार वस्तीजवळ पोलिसांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शैलेशचा गळा आवळून खून केल्याची शंका आल्याने पोलीस उपनिरीक्षक स्वामीराव पाटील यांनी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी  संशयित शंकर नारायण वडजे (रा. सेवालाल नगर) याला ताब्यात घेतले. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याच्या मोबाईल संभाषणाचे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देताना शैलेशचे वडील सुरेश घोंगडे यांनीच आपल्याला सुपारी दिल्याचे मान्य केले. मृताचे वडील सुरेश सिद्धलिंग घोंगडे यांना गुरुवारी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांनी सुपारी दिल्याचे मान्य केले. मुलगा खूप त्रास देत असल्याने शेताशेजारच्या शंकर वडजे याला सुपारी द्यावी लागली अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

या प्रकरणात शंकर वडजे मृत शैलेशच्या पाळतीवर होता. संधी साधून संजय भोजू राठोड (वय २८, रा. मुळेगाव, सध्या रा. आशा नगर, सोलापूर), राहुल चंदू राठोड (वय २८, रा़ मुळेगाव तांडा) यांच्या मदतीने शंकर वडजे याने २९ जानेवारी रोजी त्याला दारू पाजून शैलेशचा दोरीने गळा आवळला. तो मृत झाला असे समजून रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचे वडजे याने पोलिसांना सांगितले. वडिलांनी त्याला मारण्यासाठी सुपारी दिल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी पहाटे चार वाजता वळसंग पोलिसांनी वडील सुरेश घोंगडे, सूत्रधार शंकर वडजे आणि मारेकरी संजय राठोड, राहुल राठोड या चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी त्यांना अक्कलकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकारांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत, वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि शिरीष मानगावे, पोलीस उपनिरीक्षक स्वामीराव पाटील यांनी या कामी महत्त्वाची भूमिका बजावली.

असा झाला खुनाचा उलगडा 
शैलेशच्या खुनानंतर पोलिसांनीच गुन्हा दाखल केला. त्याच्या कुटुंबीयांनी या हत्येकडे गांभीर्याने पाहिले नाही. संशयितांची नावे सांगण्यास अथवा गुन्हा दाखल करण्यास कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे पोलिसांची तपासाची चक्रे घोंगडे कुटुंबीयांभोवती फिरत राहिली. त्यात शंकर वडजे सुपारीची उर्वरित रकमेसाठी मृताच्या वडिलांकडे तगादा लावत होता. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे चिडलेल्या वडजे याने पोलिसांना माहिती देण्याची धमकीही दिली. त्याची चर्चा गावात सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी शंकरला आधी ताब्यात घेतले. त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला.

२ लाखांची सुपारी, दिले ३७ हजार रुपये 
- एक महिन्यापूर्वी सुरेश घोंगडे याने शंकर वडजे याला शैलेशला मारण्यासाठी दोन लाखांची सुपारी दिली. मंगळवार बाजारातील एका हॉटेलमध्ये त्यांचा हा कट शिजला. त्यापैकी २० हजार रुपये त्याच दिवशी दिले. त्यानंतर पंधरा दिवसांनी १७ हजार रुपये देण्यात आले.

- खुनासाठी वापरलेली दुचाकी कारंबा येथील इसमाची असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी ते वाहन ताब्यात घेतले आहे. मृत शैलेश आणि त्याचे वडील हे मार्डीचे तर खुनाचा सूत्रधार शंकर वडजे सेवालाल नगर येथील आहे. संशयित आरोपी संजय राठोड मुळेगाव येथील असून तो सध्या सोलापुरात राहतो. तर दुसरा संशयित राहुल राठोड मुळेगाव तांडा येथील आहे. हा खून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारीच्या हद्दीत घडला. मृत शैलेश समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेल्याचे नातलगांनी सांगितले. या प्रकरणात अनेक गावांशी संबंध आल्याने तपासादरम्यान पोलीस चक्रावून गेले होते.
 

Web Title: father planned murder of his son in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून