अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला सात वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 11:20 AM2021-01-02T11:20:59+5:302021-01-02T11:23:48+5:30
Crime News १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापानेच जून २०१९ मध्ये अनैसर्गिक अत्याचार करीत याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
अकाेला : पिंजर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खेडेगावातील रहिवासी असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ३२ वर्षीय बापास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. यासाेबतच २० हजारांचा दंड ठाेठावला असून, दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
पिंजर गावानजीक असलेल्या एका खेड्यातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापानेच जून २०१९ मध्ये अनैसर्गिक अत्याचार करीत याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. मात्र बापाचा छळ असह्य झाल्यानंतर तिने हा प्रकार काका व आईला सांगता. त्यांनी पिंजर पाेलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी पिंजर पाेलिसांनी आराेपी बापाविरुद्ध भारतीय दंड विधानच्या कलम ३७६, ५०४, ५०६ तसेच पोस्काे कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पीएसआय मनाेज वासाडे यांनी केल्यानंतर दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने साक्षीदार तपासल्यानंतर आराेपी बापास भारतीय दंड विधानाच्या कलम ५०६ अन्वये सात वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठाेठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले, तर पाेस्काे कलमान्वये पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठाेठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा असा निकाल दिला. या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून एएसआय प्रवीण पाटील यांनी कामकाज पाहिले.