मुलीचे लैंगिक शोषण करून धमकावणाऱ्या पित्याला जन्मठेप, पाच गुन्ह्यांत नराधमाला ठोठावली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 07:18 AM2022-11-20T07:18:07+5:302022-11-20T07:21:08+5:30
उरळ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातील १५ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती सकाळी घरकाम करीत होती. तिच्या कुटुंबातील अन्य सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते.
अकोला : घरात कोणी नसताना स्वत:च्याच मुलीचे बळजबरीने लैंगिक शोषण करून ही बाब कोणाला सांगितल्यास आई आणि भावाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या ४५ वर्षीय पित्यास पाच गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेसह ५ लाख ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अवघ्या १३ महिन्यात हा निकाल विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने शनिवारी दिला.
उरळ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातील १५ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती सकाळी घरकाम करीत होती. तिच्या कुटुंबातील अन्य सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधून गुंड प्रवृत्तीच्या पित्याने स्वत:च्या मुलीवर अतिप्रसंग केला व तिला मारहाण करून ही घटना कोणाला सांगितल्यास तिच्या भावास व आईस आणि तिला मारून टाकण्याची धमकी दिली. मुलीने ही बाब घराजवळ राहणाऱ्या काकूला सांगितली. काकूने ही बाब तिच्या आईला सांगितली. त्यानंतर उरळ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ (३), ५०६, पोक्सो कायदा कलम ३-४, ५ (एल) (एन), ७-८ नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उरळचे ठाणेदार अनंत वडतकर यांनी तातडीने कारवाई करून जलदगतीने तपास पूर्ण केला आणि आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाने ११ साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी पित्यास पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरविले. हा खटला अवघ्या १३ महिन्यांत न्यायालयाने निकाली काढला. सहायक सरकारी विधिज्ञ किरण खोत यांनी पीडित मुलीची बाजू मांडली.
१३ महिन्यांत निकाल
या खटल्याचा निर्णय अवघ्या १३ महिन्यांत लागल्याने या परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. ही बाब उघडसकीस आल्यानंतर समाजाच्या सर्वच स्तरात संतापाची लाट पसरली होती.