कौटुंबिक वाद बेतला १० महिन्यांच्या बाळाच्या जीवावर, बापाने खिडकीतून फेकून केली हत्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 07:17 PM2022-05-23T19:17:06+5:302022-05-23T19:18:33+5:30
Murder Case :किशनगंज पोलीस अधिकारी ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले की, काकोली परिसरात राहणारी सायरा (२०) हिचे लग्न नाहरगड येथील अस्लमसोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता.
जयपूर - पती पत्नीत झालेल्या वादानंतर वडिलांनी दहा महिन्याच्या बाळाचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीसोबत भांडण झाल्यांतर आरोपीने मुलाला खिडकीबाहेर फेकून दिलं. यात गंभीर जखमेमुळे बाळाचा मृत्यू झाला. ही घटना बारा जिल्ह्यातील आहे. किशनगंज पोलीस ठाण्यात महिलेने या घटनेबाबत गुन्हा दाखल केला.
किशनगंज पोलीस अधिकारी ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले की, काकोली परिसरात राहणारी सायरा (२०) हिचे लग्न नाहरगड येथील अस्लमसोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता. यानंतर अस्लम दारूच्या नशेत येऊन पत्नी सायराला रोज मारहाण करत असे. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. त्यानंतर ती आपल्या १० महिन्यांच्या मुलाला घेऊन किशनगंज येथील वडिलांच्या घरी आली.
नंतर तिचा पती अस्लम सकाळी सासरी पोहोचला आणि पत्नीला ताबडतोब परत नाहरगडला येण्यासाठी जबरदस्ती करू लागला. यावर तिने स्वयंपाक करून निघण्यास सांगितलं. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि अस्लमने रागाच्या भरात १० महिन्यांच्या चिमुरडीला त्याच्या मांडीवर घेऊन खिडकीबाहेर रस्त्यावर फेकून दिले. रस्त्यावर पडल्याने निष्पाप बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर बाळाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याआधीच बाळाचा मृत्यू झाला होता.