निर्दयी बापानं पोराला पुलावरुन नदीत फेकलं, मग...; पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक सत्य उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 03:38 PM2021-11-04T15:38:57+5:302021-11-04T15:39:17+5:30
ही घटना सूरतच्या नानापुरा परिसरातील आहे. आरोपी जाकीर सईद शेखने ३१ ऑक्टोबरला त्याच्या मुलाला तापी नदीवर बनत असलेल्या पुलावर घेऊन गेला
सूरत – गुजरातच्या सूरतमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी एका बापाने स्वत:च्या पोटच्या पोराला नदीत फेकलं आहे. दिवाळीचे फटाके आणण्याच्या बहाण्याने बापाने पोराला बाहेर आणलं त्यानंतर जे कृत्य केले ते संतापजनक होतं. मुलगा सेल्फी घेताना नदीत पडल्याचा कांगावा बापाने केला. परंतु तपासात पोलिसांना जे सत्य कळालं त्याने अधिकारी हैराण झाले. त्यांनी तातडीनं आरोपी बापाला बेड्या ठोकल्या.
ही घटना सूरतच्या नानापुरा परिसरातील आहे. आरोपी जाकीर सईद शेखने ३१ ऑक्टोबरला त्याच्या मुलाला तापी नदीवर बनत असलेल्या पुलावर घेऊन गेला. याठिकाणी मुलाला त्याने नदीत फेकले. त्यानंतर कांगावा करत मुलगा नदीत पडल्याचं जोरजोरात ओरडत राहिला. तेव्हा घटनास्थळी असलेल्या लोकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती कळवली. सुरक्षा जवानांनी अथक प्रयत्नानंतर मुलाचा मृतदेह बाहेर काढला.
यापूर्वीही केलाय मारण्याचा प्रयत्न
पोलिसांनी जेव्हा या घटनेची चौकशी केली तेव्हा वडील जाकीर सईद शेखनं मुलाला फटाके आणण्यासाठी बाहेर घेऊन आल्याचं सांगितले. रस्त्यात तो पुलाच्या कठड्याजवळ उभा राहून सेल्फी काढत असताना तो नदीत पडला असं सांगितले. पोलिसांनी मृत मुलाच्या आईचीही चौकशी सुरु केली. तेव्हा आरोपीची पत्नी आणि मृत मुलाची आई म्हणाली की, मागील ५ वर्षापासून मी माझ्या पतीपासून वेगळी राहतेय. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने वाद घातले होते. इतकचं नाही तर एकदा मुलाचा जीव घेण्यासाठी बापाने त्याला दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकल्याचंही आईने सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांची कसून चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबुल केला. सुरतचे पोलीस अधिकारी एस.एम पटेल म्हणाले की, आरोपीनं मुलगा पुलावर खाली पडल्याचं सांगितलं पण तेव्हाच त्याच्या आईनं अनेक दिवसांपासून दोघं वेगवेगळे राहत असल्याचा जबाब नोंदवला. त्यानंतर पत्नीचा जबाब नोंदवल्यानंतर कळालं ५ दिवसांपूर्वी जाकीर सईदनं मुलाला त्याच्या घरी आणलं होतं. जर पोलीस ठाण्यात तक्रार केली तर मुलाला ठार करेन अशी धमकीही त्याने दिली होती. यावर सध्या पोलीस तपास करत आहे.