दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास आजन्म कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 07:17 PM2021-01-20T19:17:49+5:302021-01-20T19:18:04+5:30
Buldhana Crime News हा निर्णय बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर सत्र न्यायालयाने २० जानेवारी राेजी दिला.
मेहकर (बुलडाणा) : पाेटच्या दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास बुधवारी सश्रम आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निर्णय बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर सत्र न्यायालयाने २० जानेवारी राेजी दिला. आराेपीस दहा हजार रुपये दंडही ठाेठावला असून, दंड न भरल्यास आणखी दाेन वर्षे कारावासाची शिक्षेची तरतुद केली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील डाेणगाव पाेलीस स्टेशन अंर्तगत गावात घडली हाेती. गावातील ४८ वर्षीय नराधम बाप त्याच्या पत्नी, तीन मुली व एका मुलासह पुणे येथे मजुरी करीत हाेता. दरम्यान, त्याच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे ताे मुलांसह गावी परतला. त्याला दारूचे व्यसन हाेते. २०१८ मध्ये एका दिवशी सर्वजण झाेपलेले असताना नराधम बापाने दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पिडीत मुलीने दुसऱ्या दिवशी ही बाब लहान दाेन बहिणींना सांगितली. मात्र वडील मारून टाकतील म्हणून कुणाला सांगितले नाही. दरम्यान, २० सप्टेंबर राेजी रात्री पुन्हा नराधम बापाने दिव्यांग मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिडीत मुलीने व तिच्या बहिणीने आरडाओरड करून त्याचा डाव उधळून लावला. २१ सप्टेंबर राेजी याबाबत पिडीत मुलीने तिच्या काका व काकूस सांगितले. मुलीने काकासाेबत पाेलिसात धाव घेऊन बापाविराेधात तक्रार दिली. पाेलिसांनी बापाविराेधात भादंविच्या कलम ३७६ (२) (एफजेएल) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला हाेता. या गुन्ह्याचा तपास पाेलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. मुंडे यांनी करून मेहकर येथील सत्र न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. या प्रकरणात पिडीत मुलीच्या बहीणीसह एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. अतिरिक्त सरकारी अभियाेक्ता जे. एम. बाेदडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. खाेंगल यांनी आज आराेपी पित्यास सश्रम आजन्म कारावासाची शिक्षा ठाेठावली.