विनापरवाना वैद्यकीय उपकरणे विकणाऱ्यांना एफडीएचा दणका
By स्नेहा मोरे | Published: August 3, 2022 07:08 PM2022-08-03T19:08:22+5:302022-08-03T19:09:07+5:30
१२ लाखांची उपकरणे जप्त
स्नेहा मोरे, मुंबई: गुप्तवार्ता विभाग, अन्न व औषध प्रशासन, मुख्यालय, मुंबई यांचे गोपनीय माहितीच्या आधारे २ ऑगस्ट रोजी गुप्तवार्ता विभाग व ठाणे कार्यालायचे क्षेत्रीय औषध निरिक्षक यांच्या पथकाने निरजकुमार विश्वकर्मा, यांच्या मालकीच्या मे. शेलमार्क लाइफ केअर, प्रा. लि. , भारत इको विष्टा, शिळफाटा, ठाणे या इमारतीतील एका सदनिकेत पंचासह तपास- चौकशी साठी धाड टाकली. या जागेत सिडँक लाइफ केअर बहादूरगड, हरियाणा या उत्पादकाच्या कोविड-१९, एचआयव्ही, हिपँटायटीस, सिफिलीस, मलेरिया, डेंग्यू, विषमज्वर इ . आजाराच्या नैदानिक चाचणीसाठी लागणाऱ्या रँपीड टेस्ट किट चा मोठ्या प्रमाणावर साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
धाड टाकलेल्या जागेस औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व मेडिकल डिव्हायसेस नियम, २०१७ नुसार नैदानिक चाचणी संच विक्रीसाठी आवश्यक परवाना मंजूर नव्हता. सदर प्रकरणात वरील रँपिड नैदानिक चाचणी संचांची विनापरवाना विक्री होत असल्याचे निष्पन्न झाल्याने उपलब्ध साठ्यातून प्रातिनिधीक नमुने चाचणी व विश्लेषणा साठी घेण्यात आले व उर्वरित रु. १२.४० लक्ष किमतीचा साठा औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० मधील कलम १८ (सी) चे उल्लंघन झाल्याने जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी आवश्यक तपास करून संबंधिता विरुद्ध कायदेशीर कारवाई नियोजित आहे. वरील कारवाई श्री. वि. रा. रवी, शशिकांत यादव, औषध निरीक्षक गुप्तवार्ता व श्री. अजय माहुले , औषध निरीक्षक यांनी पार पाडली.