‘पीएफ’ अधिकाऱ्याकडे घबाड; ३ फ्लॅट, कोट्यवधीचे व्यवहार अन् बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 09:15 AM2023-07-13T09:15:44+5:302023-07-13T09:16:43+5:30

कोट्यवधी रुपयांचे व्यवहार, केंद्रीय अन्वेषण विभागाकडून गुन्हा दाखल

Fear of 'PF' officer; 3 flats, transactions worth crores and many more... | ‘पीएफ’ अधिकाऱ्याकडे घबाड; ३ फ्लॅट, कोट्यवधीचे व्यवहार अन् बरेच काही...

‘पीएफ’ अधिकाऱ्याकडे घबाड; ३ फ्लॅट, कोट्यवधीचे व्यवहार अन् बरेच काही...

googlenewsNext

मुंबई - मुंबईच्या उपनगरांत तीन फ्लॅट, बँकांत लाखोंच्या मुदतठेवी, ८ बँक खात्यातून कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार, गाड्या... अशी माया गोळा करणाऱ्या प्रॉव्हिडंट विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करत दणका दिला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि जेट एअरवेज कंपनीच्या १३ कर्मचाऱ्यांविरोधातही हा गुन्हा दाखल झाला आहे. मच्छिंद्र जगन्नाथ बामणे असे या अधिकाऱ्याचे नाव असून कांदिवली येथील कार्यालयात तो कार्यरत असताना २०१७ ते २०२२ या कालावधीमध्ये त्याने मोठी माया गोळा केल्याचे सीबीआयच्या तपासात निदर्शनास आले आहे.

प्रॉव्हिडंट फंड विभागाचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यातील पैसे काढून देण्यासाठी तो लाचखोरी करत होता. जेट एअरवेजमधील १३ कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यातील पैसे काढून देण्यासाठी त्याने सव्वा लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. हे प्रकरण प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या दक्षता अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी सुरू केली असता केवळ जेट एअरवेज नव्हे तर २०११ पासून त्याने आजवर मोठी माया व मालमत्ता गोळा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विभागाने दिलेल्या अहवालाच्या आधारे सीबीआयकडे तक्रार करण्यात आली आणि आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तपासादरम्यान, बामणे व त्याच्या पत्नीची एकूण आठ बँक खाती असल्याचे सीबीआयला आढळले. त्यामध्ये २०११ पासून अशाच पद्धतीने कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले. काही प्रकरणात बामणे याने संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या खात्यामध्ये रोखीनेही पैसे भरण्यास सांगितल्याचे व्यवहारावरून दिसून आले. याखेरीज त्याने बोरिवली, दहिसर, भाईंदर येथे घेतलेले तीन फ्लॅट, त्याच्याकडे असलेली वाहने, बँक खात्यात असलेली रक्कम याचा स्रोत त्याला समाधानकारकरीत्या नमूद करता आला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दक्षता विभागाच्या अहवालानंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लाचेपोटी मिळणारे पैसे त्याने स्वतःच्या तसेच स्वतःच्या पत्नीच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा केल्याचे दिसून आले. 

Web Title: Fear of 'PF' officer; 3 flats, transactions worth crores and many more...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.